मुंबई- आदिवासी शेतकरी मोर्चाला मदत केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांना अटक नोटीस पाठवली आहे. तुम्ही आदिवासींना जमवले आणि पुन्हा जमवण्याचा धोका आहे,म्हणून तुम्हाला अटक का करू नये?असे या नोटीसमध्ये लिहले आहे. सरकार पोलीस प्रशासनाचा चुकीचा वापर करत आहे. या विरोधात उद्या बुधवारी मुंबई पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते धनंजय शिदे यांनी सांगितले.
प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २३ नोव्हेंबर २०१८ ला १२ हजार आदिवासी शेतकरी मुंबईत धडकले होते. त्यांनी ठाणे ते मुंबई असा मोर्चा काढला होता. यावेळी मुंबईत मोर्चेकऱ्यांची राहण्या खाण्याची व्यवस्था पाहणाऱ्या ५ मुख्य कार्यकर्त्यांना ३ महिन्यानंतर आझाद मैदान पोलीसांनी अटक नोटीस दिली आहे. पोलीसांनी रवि भिलाणे,फिरोज मिठीबोरवाला,ज्योती बडेकर,स्मिता साळुंखे,अफरोज मलिक आदींना नोटिसा दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी मोर्चेकऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांच्या सर्व मागण्या लेखी मान्य केल्या होत्या. गिरीश महाजन आझाद मैदानात येऊन आंदोलनाचा समारोप करून गेले. मोर्चेकऱ्यांना गावी परतण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्थाही केली होती. संपुर्ण आंदोलनात एकही चुकीची घटना घडली नाही. परंतु,५ मार्च रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात सद्यस्थितीवर पत्रकार परिषद घेण्याकरिता हे कार्यकर्ते पत्रकार संघात गेले असता आझाद मैदान पोलीसांनी या नोटीसा दिल्या. लवकरच तुम्हाला कोर्टाची तारीख कळवू,असेही पोलिसांनी सांगितले.
पत्रकार परिषद संपवून ५ वाजता हॉल बाहेर हे कार्यकर्ते आले असता पोलिसांनी पुन्हा दुसरी नोटीस दिली. नोटिसमध्ये विविध कलामान्वये गुन्हा नोंदवला असल्याचे लिहले होते. शनिवार २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदान जवळच्या किल्ला कोर्टात हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांच्या या तत्परतेने कार्यकर्ते अवाक् झाल्याची प्रतिक्रिया रवी भिलाने यांनी दिली. अवघ्या २ तासात कोर्टात चार्जशीट दाखल करून पोलीस कोर्टाची तारीख देऊन गेले. पोलिसांच्या या कृतीवर संशय व संताप व्यक्त केला जात आहे.