मुंबई :मुंबईमध्ये गुन्हेगारीचा आलेख वाढतच चालला असल्याचे दिसते. रोज नवीन फसवणुकीच्या, गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत.कापड उद्योग क्षेत्रात लिवाईस ही नामांकित कंपनी आहे. या कंपनीची भारतासह विदेशात कपड्याची विक्री होते. या कंपनीच्या बनावट कपड्याची गोरेगाव येथील फिल्म सिटी रोड, संतोष नगरच्या स्मिता इंटरप्रायजेसमध्ये विक्री होत असल्याची माहिती दहिसर युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे छापा टाकला होता. यावेळी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी लिवाईस कंपनीच्या तीनशेहून अधिक टी शर्ट, कपडे बनविण्यासाठी लागणारे फ्युजिंग व मशिनरी असा सोळा लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
बोगस कपड्यासह इतर साहित्य जप्त : तर दुसर्या घटनेत आंबोली पोलिसांनी जोगेश्वरीतील ऑफ एस. व्ही रोड, ऍनेक्स इमारतीच्या एका शॉपमधून छापा टाकून देवांग लक्ष्मीकांत ठक्कर आणि अमीर अन्वर खान या दोघांना अटक केली. या शॉपमधून पोलिसांनी आठ लाख रुपयांचा बोगस कपड्यासह इतर साहित्य जप्त केले. चौकशीत ते कपडे लिवाईस कंपनीचे नव्हते. कंपनीचे लेबल लावून या कपड्याची विक्री केली जात होती. कंपनीसह ग्राहकांची फसवणुक केली जात होती. या तिन्ही आरोपींविरुद्ध स्वामीत्व हक्काचे उल्लघंन करुन बनावट कपड्याची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यात नंतर त्यांना अटक करण्यात आली होती.