मुंबई:दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याने १२ फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास आयआयटी मुंबईतील वसतीगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली होती. दर्शनने जातीय भेदभावातून आत्महत्या केल्याचा दावा दर्शनच्या कुटुंबीयांनी आणि आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. विविध संघटनांनी केलेल्या मागणीनंतर सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकाला ०३ मार्च रोजी दर्शनच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली होती. गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) हस्तलेखन विश्लेषण विभागाने याची माहिती दिली असून या प्रकरणाशी संबंधितांच्या अडचणी येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे.
ती चिट्ठी सीआयडीकडे: पवई पोलिसांनी दर्शनच्या वडिलांची फिर्याद नोंदवून घेत अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर विशेष तपास पथकाने ताब्यात घेतलेल्या चिठ्ठीतील अक्षर हे दर्शनचे आहे का, हे तपासण्यासाठी ही चिठ्ठी सीआयडीकडे पाठवली होती. सीआयडीच्या हस्तलेखन विश्लेषण विभागाने चिठ्ठीतील हस्ताक्षर हे दर्शनचेच असल्याचा अहवाल दिला आहे.