मुंबई - धावत्या लोकलमधून दगड भिरकवल्याने कर्तव्यावर असलेला पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना समोर आली. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील डॉकयार्ड रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. या दगडफेकीत पोलीस कर्मचारी सुनील चव्हाण जखमी झाले आहेत.
डॉकयार्ड रेल्वे स्थानकावर धावत्या लोकलमधून दगडफेक; पोलीस कर्मचारी जखमी - डॉकयार्ड रेल्वे स्थानक पोलीस दगडफेक न्यूज
धावत्या लोकलमधून डॉकयार्ड रेल्वे स्थानकावर दगडफेक झाली. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले आहे.

अशी घडली घटना -
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील डॉकयार्ड रेल्वे स्थानकातून शुक्रवारी दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडे लोकल जात होती. या यादरम्यान पोलीस कॉन्स्टेबल सुनील चव्हाण रेल्वे स्थानकावर आपले कर्तव्य बजावत होते. लोकल जात असताना एका व्यक्तीने लोकलमधून दगड भिरकावला. हा दगड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण यांच्या छातीला लागला. वेगात आलेल्या दगडामुळे सुनील चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रवाशांनी 100 क्रमांकावर संपर्क साधून चव्हाण यांनी रूग्णालयात दाखल केले. चव्हाण यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू -
या घटनेची माहिती मिळतात वडाळा लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या अनोळखी व्यक्तीचा शोध घेण्यासाठी रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येणार आहे. काही दिवसांवर होळी, धुलीवंदन येऊन ठेपले आहेत. या सणांच्या पार्श्वभूमीवर काही समाजकंटक लोकलवर पाण्याने, अॅसिडने भरलेले फुगे फेकतात. यामुळे अनेक प्रवाशांना इजा होते. दगड फेकीच्या घटनांमुळे देखील अनेकदा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने मध्य, हार्बर मार्गावर कडक बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात आली आहे.