मुंबई- 26 11 ला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अजमल कसाब या अतिरेक्याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले होते. अजमल कसाबला पकडण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या संजय गोविलकर या अधिकाऱ्याला मुंबई पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक सोहेल भामला याला मुंबई विमानतळावरून पलायन करण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली हे निलंबन करण्यात आले आहे. संजय गोविलकर यांच्याबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र शिंगोटे या अधिकाऱ्याला सुद्धा निलंबित करण्यात आले आहे .
हे दोन्ही अधिकारी सध्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत होते. 2004 मध्ये बनावट नोटांच्या प्रकरणांमध्ये सोहेल भामला याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याचबरोबर मुंबईतील जुहू परिसरांमध्ये एका व्यापाऱ्याला बंगला खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केल्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल केला होता.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई पोलिसांच्या वॉन्टेड लिस्टमध्ये असलेल्या सोहेल भामलाला फरार घोषीत केले होते. दाऊद इब्राहिमच्या या खास हस्तकाला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून लूक आऊट नोटीस सुद्धा जारी करण्यात आली होती.