मुंबई -गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई पोलीस कोरोनाच्या या संकटात आली सेवा देत आहेत. मात्र, आता पावसातही एक पोलीस अधिकाऱ्याने 90 वर्षीय वृद्ध महिलेला चक्क खांद्यावर उचलून एका सुरक्षतस्थळी पोहोचविले. या घटनेतून पोलिसांच्या माणुसकीचे आणखी दर्शन घडले. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
चंद्रकांत लांडगे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. लांडगे हे घाटकोपर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक आहे. त्यांच्याकडे जनसंपर्क विभाग आहे. लांडगे यांनी डोंगरावर राहणाऱ्या 90 वर्षीय वृद्ध महिलेस उचलून घेत दरड कोसळण्याच्या दुर्घटनेतून वाचवले. त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाला. या व्हिडिओत ते एका वृद्ध महिलेला खांद्यावर उचलून नेत असल्याचे दिसत आहे. 14 जुलैपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संजय नगर या डोंगराळ झोपडपट्टी धोकादायक स्थितीत काही लोक रहात होती. पावसामुळे याठिकाणी जमीन खचून दरड कोसळली होती. यामुळे येथे राहणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. यामुळे घाटकोपर पोलिसांनी दक्षता म्हणून येथील धोकादायक स्थितीमध्ये असलेल्या घरातील कुटुंबाना इतरत्र स्थलांतरित केले.