मुंबई -रस्त्यावर भांडण करत असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर पोलीस ठाण्यात झालेल्या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी वडाळा पोलीस ठाण्यासमोर आज (मंगळवार) आंदोलन केले आहे. दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. विजय सिंह (वय 26 रा. अंटोफील) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप; मुंबईत कुटुंबीयांची निदर्शने पोलिसांनी पकडून मुलाला बेदम मारहाण केल्यामुळे घाबरून मुलाचा मृत्यू झाला, असे त्याच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी सांगितले आहे. त्यामुळे लवकरात लवकर दोषी पोलिसांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यासाठी आज (मंगळवारी) मृताचे कुटुंबीय आणि स्थानिक आमदार कॅप्टन सेलवन यांनी वडाळा पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली.
काय आहे प्रकरण?
27 ऑक्टोबरला मुंबईतील वडाळा ट्रक टर्मिनल येथे काही व्यक्ती भांडत असल्याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल आला होता. त्यानुसार घटनास्थळी पोलिसांची बीट मार्शल दाखल झाली, पोलिसांनी काही व्यक्तींना ताब्यात घेतले होते. त्यात विजय सिंग याचा सुद्धा समावेश होता. पोलीस ठाण्यात तरुणांना आणल्यानंतर त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, काही वेळातच विजय सिंग याने त्याच्या छातीत दुखत असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्याला तत्काळ सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना विजय याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विजय सिंगच्या नातेवाईकांनी त्याचा मृत्यू हा पोलीस मारहाणीत झाल्याचा आरोप केला. याप्रकरणी अधिक तपासासाठी विजयचा मृतदेह जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर केलेल्या आरोपानंतर गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार असल्याचा, मुंबई पोलीस विभागाचे प्रवक्ते अशोक प्रणय यांनी सोमवारी सांगितले.