मुंबई -सीएसटीजवळील हिमालय पूल कोसळण्याच्या घटनेचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून दोषींवर आरोपपत्र दाखल केले जाईल, अशी ग्वाही मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयु्क्त संजय बर्वे यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत व्यक्त केली आहे. लाचखोरीत अडकणाऱया पोलिसांना नोकरीतून बडतर्फ करण्याची त्यांचे पूर्वसूरी सुबोध जय़स्वाल यांनी सुरू केलेली पंरपरा आपणही कायम ठेवू, असे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले.
पूल कोसळण्याचा घटनेचा लवकरच तपास पूर्ण करू - संजय बर्वे मुंबई पोलीस आयुक्त पदाची नुकतीच सूत्रे हाती घेतलेल्या संजय बर्वे यांची ईटीव्ही भारतचे मुंबई ब्युरो हेड प्रमोद चुंचूवार यांनी विशेष मुलाखत घेतली. यावेळी बर्वे यांनी महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचे म्हटले. आगामी लोकसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामुळे खुल्या आणि मोकळ्या वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजेत यासाठी निवडणुकांविषयक पोलिसांच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे, असे संजय बर्वे यांनी म्हटले.
पोलीस अधिकाऱ्यांनी कोणत्याही लोभाला बळी पडू नये, जेणेकरून त्यांच्यावर कारवाईची वेळ येणार नाही, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. अशा घटनांमुळे व्यवस्था व शासन प्रणालीवरचा विश्वास उडतो, अशी घोडचूक जर कोणी केली तर माझ्याकडे क्षमा असणार नाही असे देखील बर्वे यांनी म्हटले आहे.
मुंबईसारख्या मेट्रो शहरात विविध क्षेत्रात महिला वर्ग मोठया संख्येने कार्यरत आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य नेहमीच देण्यात येईल. त्यांच्या सुरक्षेसाठी चौका चौकात, नाका नाक्यात पोलीस हजर असतील व त्यांची गस्त असेल. महिलांना त्यांच्या समस्यांसाठी पोलीस नियंत्रण कक्षाकडून त्वरित सहकार्य मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पोलीस आयुक्तालयात नागरिकांना मला भेटण्यासाठी पूर्णपणे मुभा आहे. मंगळवारी व गुरुवारी संध्याकाळी ४. ३० वाजल्यानंतर नागरिक भेटू शकतात. वेटिंग हॉलमध्ये नागरिकांना मी स्वतः भेटतो आणि त्यांच्या अडचणी तिथे सोडवण्याचा प्रयत्न करतो असेही संजय बर्वे यांनी सांगितले.