जखमी युवकाला रुग्णालयात नेण्यास नकार; तीन टॅक्सी चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल
रेल्वेच्या चाकाखाली पाय अडकून गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयता नेण्यास नकार देणाऱ्या तीन टॅक्सी चालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, तर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्या जखमी तरुणाला जीवदान मिळाले आहे.
मुंबई- रेल्वे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे प्राण वाचवण्यासाठी दोन पोलिसांनी त्या तरुणाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी २ टॅक्सी चालकांना विनंनी केली होती. मात्र, तरीही या चालकांनी भाडे नाकारले. त्यामुळे या मुजोर टॅक्सी चालकांविरोधात मुंबई पोलिसांच्या पायधुनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राविकेश रावत असे जखमी तरुणाचे नाव आहे, याच्यावर तत्काळ उपचार झाले नसते तर त्याच्या जिवास धोका निर्माण झाला असता.
जखमी तरुण रेल्वे ट्रॅकवर होता पडून
बुधवारी रात्री साडेनऊ वाजता मज्जित बंदर येथे गदग एक्सप्रेस ही रेल्वे प्रमाणापेक्षा अधिक वेळ थांबली होती. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर या ठिकाणी गस्तीवर असलेल्या जीआरपीच्या जवान जयवंत वाकडे आणि शिवाजी धांडे या दोघांनी तत्काळ रेल्वे जवळ धाव घेतली. यादरम्यान रेल्वे ट्रॅकवर राविकेश रावत हा तरुण जखमी अवस्थेत खाली पडला होता. त या तरुणाचा उजवा पाय रेल्वेच्या चाकाखाली आल्यामुळे तो गंभीररित्या जखमी झालेला होता. पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने तत्काळ या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी या तरुणाला उचलून सॅन्डहर्स्ट रोड स्टेशनच्या बाहेर आणले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी तिथे उभ्या असलेल्या काही टॅक्सी चालकांना विनंती केली. मात्र तिन्ही टॅक्सी चालकांनी या रुग्णाला रुग्णालयात नेण्यास स्पष्टपणे नकार दिला. मात्र चौथ्या टॅक्सी चालकाने सदर रुग्णाला जे जे रुग्णालयात नेऊन दाखल केले.