मुंबई- घाटकोपर पोलिसांनी प्रतिबंधित अशा व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून १ किलो १३० ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत १ कोटी ७० लाख रुपये आहे. अंबरग्रीस हा खूप किमती पदार्थ आहे. याचा वापर सुगंधी द्रव्ये तसेच औषधे बनवण्यासाठी केला जातो.
पोलिसांनी जप्त केलेला अंबरग्रीस पदार्थ हा पदार्थ व्हेल माशाच्या आतड्यात तयार होतो. जेव्हा व्हेल मासा उलटी करतो तेव्हा हा पदार्थ त्याच्या शरीरातून बाहेर सोडला जातो. अत्तर बनविणाऱ्या कंपन्या या अंबरग्रीससाठी मोठी रक्कम मोजण्यासाठी तयार असतात.
अंबरग्रीस विकण्यासाठी १५ जून रोजी ६ वाजता विद्याविहार कामालेन येथे एक व्यक्ती येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे घाटकोपर पोलिसांनी आणि वन विभागाने सापळा रचून राहुल कृष्णाजी दुपारे (वय ५३ रा. नागपूर) यास अटक केली.
आरोपीाच्या ताब्यातील अंबरग्रीसचे वजन १ किलो १३० ग्रॅम असून याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत १ कोटी ७० लाख आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुसरा आरोपी ललित व्यास यासही अटक केली असून तो गुजरातचा रहिवासी आहे. घाटकोपर पोलिसांनी २ आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. या तस्करीमागे आंतरराष्ट्रीय व्यवहार आहे का?याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.