नवी मुंबई - लाचलुचपत विभागाने सोमवारी सिडकोचे विकास अधिकारी प्रीतीमसिंग रजपूत आणि भूमापन नियंत्रक विकास खडसे यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. लाचलुचपत विभागाने बेड्या ठोकलेल्या या दोन्ही अधिकाऱ्यांचे लाच घेण्याचे माध्यम उपहारगृहातील कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदीप पाटील या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून या दोघांनी लाच घेतली आहे.
एक चमचा साखर म्हणजे १ लाख रुपये; सिडकोच्या अधिकाऱ्याची लाच घेण्याची फिल्मी पद्धत रबाळे येथील संजय जगदाळे हे एक ते दोन हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधकाम करत आहेत. नवी मुंबईतील गावठाण क्षेत्रातील सर्व जमीन सिडकोच्या मालकीची असून येथील बांधकामाला अधिकृत परवानगी नाही. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींचा वाद सरकारदरबारी अजून प्रलंबित आहे. सरकारने डिसेंबर २०१५ पर्यंत सर्व बेकायदेशीर बांधकामे कायम करण्याचे धोरण ठरवले आहे. हे धोरण मुंबई उच्च न्यायालयात अडकले असून २०१५ नंतरच्या कोणत्याही बांधकामाला गावात परवानगी नाही. असे असताना अनेक गावांत सिडकोच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन देऊन भूमाफिया बिनधास्त बांधकाम करत आहेत.
रबाळे येथे सुरू असलेल्या अशाच बांधकामाला सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकातील नियंत्रक प्रीतीमसिंग रजपूत व विकास खडसे यांनी दमदाटी करून १० लाख रुपयांची मागणी केली होती. ही लाच न दिल्यास सुरू असलेले बांधकाम तोडण्यात येईल अशीही दमदाटी या दोघांनी केली होती. दहा लाखांतील अडीच लाखांचा पहिला हप्ता रायगड भवन उपहारगृहातील कर्मचारी प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून स्वीकारताना लाचलुचपत विभागाने या दोघाना अटक केली. उपहार गृहातील कर्मचाऱ्याने या २ अधिकाऱ्यांसाठी लाच स्वीकारल्याचे सांगितले.
१ चमचा साखर म्हणजे १ लाख रुपये -
भ्रष्टाचारावर आधारित एका हिंदी चित्रपटात लाच घेण्याची ही शक्कल दाखविण्यात आलेली आहे. या चित्रपटातील शासकीय कर्मचारी अभिनेते कादरखान लाच घेण्यासाठी एक सांकेतिक शब्द वापरून कार्यालयाच्या खाली असलेल्या चहाच्या दुकानात ही लाच देण्याचे संकेत देत असत. त्यासाठी एक चमचा साखर म्हणजे १ हजार रुपये तर, २ चमचा साखर म्हणजे २ हजार रुपये असे सांकेतिक शब्द होते. सिडकोतील लाच घेण्यासाठी उपहारगृहातील कर्मचाऱ्यांचा गेली अनेक वर्षे वापर केला जात आहे. त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून साखरेचा हवाला दिला जात असे. या ठिकाणी १ चमचा साखर म्हणजे १ लाख रुपये असा होता. ही रक्कम जमा करण्याच्या बदल्यात या कर्मचाऱ्यांना चांगली रक्कम हिस्सा म्हणून मिळत असल्याने अलीकडे ४ महिने या उपहारगृहातील कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही तरी त्याचा कर्मचाऱ्यांना फारसा फरक पडला नव्हता.