मुंबई : सोमवारी सायंकाळी 7 च्या सुमारास मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून बोरिवली परिसरात चोरीला गेलेल्या रिक्षातून दोघे आरडीएक्स घेऊन जात असल्याची खोटी माहिती हॉक्स कॉल करणाऱ्याने पोलिसांनी दिली होती. त्याचप्रमाणे बोरिवलीत बॉम्बस्फोट घडवून आणणार आहे अशी खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या सूरज जाधव ( वय ३२ ) या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
तात्काळ तपासाला सुरुवात : हॉक्स कॉल येताच प्रकरण गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी तपास केल्यानंतर फोन काॅल फसवा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या आरोपीचा शोध सुरु केला. सुरज जाधवची चौकशी केली असता, त्याने हा कॉल विनोद म्हणून केल्याचे सांगितले. मात्र, यापूर्वीही मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यात चोरी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे सुरज जाधव विरोधात दाखल आहेत.
सहपोलीस आयुक्तांना देखील कॉल :दोन दिवसांपूर्वीच मुंबई पोलीस दलाच्या वाहतूक विभागात पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांना रात्री 1 वाजून 11 मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या सेम मोबाईल क्रमांकावरून तांत्रिक हेराफेरी करून अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. कॉल करून या व्यक्तीने प्रवीण पडवळ यांना मीरा-भाईंदर परिसरात बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली. अज्ञात व्यक्ती हिंदी भाषिक असल्याचे त्याच्या बोलण्यावरून कळत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी सर्व माहिती प्रवीण पडवळ यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीचा शोध मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.