मुंबई :दरोडा प्रकरणी दादर पोलीसांनी एका आरोपीला अटक केली आहे. परंतु दुसरा आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा दादर पोलीसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणी भारतीय दंड संविधान कलम 394, 397, 452, 342सह कलम 3, 25 आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी एका 70 वर्षीय महिलेला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला. सोमवारी संध्याकाळी दादरमधील वृद्ध महिलेच्या घरातून १२ लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने आणि रोकड लुटली, असे दादर पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
अशी घडली घटना : मुंबईमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे.दादर (पश्चिम) येथील कीर्ती महाविद्यालयाजवळील एका सोसायटीत ही घटना घडली. दरोड्याच्या वेळी वृद्ध महिला घरात एकटीच होती. सुमारे 40 वय असलेल्या एका अनोळखी इसमाने दुपारी महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावला, 4.45 ते 5.15 वाजण्याच्या सुमारास इमारतीत प्रवेश केला. ज्येष्ठ नागरिक महिलेने दार उघडताच, शस्त्रधारी व्यक्ती आत घुसला. खिशातून बंदूक बाहेर काढली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
चोरीस गेलेले सोन्याचे दागिने : सुमारे 70 वर्षीय वृद्ध महिला घरी असताना वर नमूद वर्णनाचा इसम ह्याने रायकर यांच्याकडून मिठाई घेऊन आलो आहे, असा बहाना करून घराच्या आत जबरदस्तीने प्रवेश केला. एका हाताने तक्रारदार यांचा गळा त्याने आवळला होता. त्याच्या पॅन्टच्या खिशातील बंदुकीसारखे शस्त्र बाहेर काढले. महिलेच्या गळ्यावर ते रोखले. त्याचा धाक दाखवून घराच्या बेडरूममधील लोखंडी कपाटातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. सोन्याच्या बांगड्या, कानातील सोन्याचे दागिने, गळ्यातील वापरायचे सोन्याचा नेकलेस हार असे सुमारे वीस ते पंचवीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने किंमत अंदाजे 10 ते 12 लाख रुपये आहे.
आरोपीची ओळख :आरोपी हा 40 ते 45 वयोगटातला आहे. त्याची उंची पाच ते साडेपाच फूट आहे. रंग सावळा आणि मध्यम बांधा असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. तसेच गुन्ह्याच्या वेळी आरोपीने डोक्यावर निळी टोपी, अंगात निळा रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट घातली होती, असे वृद्ध महिलेने सांगितले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पोलीस फरार असलेल्या आरोपीचा शोध घेत आहेत.
हेही वाचा: Amar Mulchandani: ईडीच्या तक्रारीवरून सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षासह ५ जणांना अटक; २.७३ कोटी रुपयांचे दागिन्यासह ४० लाख जप्त