मुंबई:न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करून आरोपीला फरार घोषित केले : दादर येथील हिंदमाता परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय करणारे तक्रारदार ए. एच. गंगर (४०) यांच्याकडे आरोपी जडेजा हा १५ वर्षांपूर्वी कामाला होता. अन्य व्यापाऱ्यांकडे उधार असलेली रक्कम गंगर यांनी प्रवीणला आणण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी मिळालेल्या ४० हजार रुपयांवर त्याने डल्ला मारला. तो लघुशंकेला गेले असताना कोणीतरी रक्कम असलेली पिशवी चोरल्याचा बनाव रचला. याप्रकरणी रफी किडवाई मार्ग पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम ४०८ अंतर्गत गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. मात्र, या गुन्ह्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी तो न्यायालयात हजर राहत नव्हता. त्यामुळे दादर येथील न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करून त्याला फरार घोषित केले होते.
दातांच्या हिंटवरून तपास केला सुरू: गेल्या १५ वर्षांपासून जडेजा फरार होता. या गुन्ह्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखडे, पोलीस हवालदार नारायण कदम, सुरेश कडलग, रवींद्र साबळे, महिला पोलीस शिपाई विद्या यादव आणि पोलीस शिपाई सुशांत बनकर यांनी तपासाची चक्रे जोरदार फिरवली. त्यानंतर पोलिसांना जडेजाबाबत काही माहिती मिळाली. ती माहिती अशी की, आरोपीचे पुढील वरचे दोन दात सोन्याचे आहेत. याच्या दातांच्या हिंटची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्याअनुषंगाने तपास सुरू केला. आरोपीच्या जडेजा या आडनावावरून तो गुजरात राज्यातील कच्छ येथील रहिवासी असल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी दाताच्या माहितीच्या आधारे जोरात सर्च ऑपरेशन सुरू केले.