मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस येथे शालिमार एक्स्प्रेसमध्ये काल (बुधवार) दुपारी जिलेटीनच्या ५ कांड्या आणि बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेमागे शहरात काही घातपात घडविण्याचा कट आहे का? याचा पोलीस शोध घेत होते. मात्र, तसे काहीही नसून पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस अटक करण्याच्या उद्देशाने हा कट आखला होता. पोलीस तपासात हा प्रकार निष्पन्न झाला आहे. पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी याबाबत माहिती दिली. या प्रकरणी पोलीसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची त्यांनी माहिती दिली.
याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात तब्बल तीस तासाच्या नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे शालिमार एक्स्प्रेसमध्ये सफाई कर्मचारी गाडीची साफसफाई करत होते. त्यावेळी सीट क्रमांक ४० आणि ४१ या दोन्ही सीटच्यामध्ये जिलेटीन सदृश्य कांड्या, बॅटरी आणि त्याच्या बाजूला भाजप सरकारच्या विरोधात लिहिलेल्या मजुकराची चिठ्ठी आढळून आली होती. त्यानंतर लोहमार्ग पोलीस आणि टिळक नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी सर्व शक्यता तपासत या कृत्यामागच्या गुन्हेगारांचा शोध सुरू केला होता.