मुंबई- पोलीस खात्यातील 94 पोलीस ठाण्यातील पोलीस हे 12 तास काम केल्यावर 24 तास सुट्टी, अशा प्रकारे काम करत आहेत. मुंबई पोलीस खात्यातील बहुतांश पोलीस कर्मचारी हे नवी मुंबई, पनवेल, ठाणे, भाईंदर, नालासोपारा यासारख्या ठिकाणी राहत आहेत. त्यामुळे अशा पोलीस कर्मचाऱ्यांना त्या-त्या परिसरातील एका ठराविक पीकअप पॉईंटवरून प्रवासासाठी 'बेस्ट' बस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस खात्यातील 55 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या व 52 वय असून मधुमेह, हायपरटेन्शन सारखे आजार असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरी राहण्याचे निर्देश दिले आहेत. ठाणे, पनवेल सारख्या परिसरात राहणारे शेकडो पोलीस कर्मचारी हे कर्तव्यावर हजर होण्यासाठी स्वतःच्या खासगी दुचाकी वाहनाचा वापर करताना पाहायला मिळत आहेत. मात्र, पोलीस कर्मचारी व इतर सरकारी कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सध्या दरदिवशी बेस्ट प्रशासनाकडून 2700 बेस्ट बसच्या फेऱ्या चालविण्याचा प्रयत्न केला जात आहे.