मुंबई- कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविणासाठी प्रशासकीय स्तरावर सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचे समोर आले. 30 जूनपर्यंत असणारे लाॅकडाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या संदर्भात नव्या नियमानुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईतील नागरिकांना आता २ किमी आवारातच तेही महत्वाचे काम असल्यासच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. विनाकारण दुचाकी किंवा चारचाकी वाहन रस्त्यावर आणून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
एकाच दिवसात ४ हजार ८६४ वाहने जप्त
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर अचानक उत्तर मुंबई परिसरात कोरोना रुग्णाच्या संख्येत दुपटीने वाढ झाली. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. २८ जून रोजी उत्तर मुंबईत २२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. याठिकाणी १ हजार ३०६ वाहन जप्त केली आहेत. तसेच कुलाबा परिसरात १५४, गिरगाव ३७७, नागपाडा १०८, धारावी ३००, दादर माटुंगा परिसरात २९०, चेंबूर २१०, घाटकोपर ३३४, वाकोला २१२ तर सांताक्रुज परिसरात २५७ वाहन जप्त केली आहेत. मुंबई शहर व उपनगरात एकूण ४ हजार ८६४ वाहने जप्त केली आहेत.