मुंबई :मुंबईच्या एका झोपडपट्टीमध्ये फेब्रुवारी 2016 या काळातील रात्रीच्या सुमारास शेजारील आरोपीनेच लहान मुलगी घरामध्ये एकटी आहे, ही संधी साधून तिच्यावर बलात्कार केला. तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर पोलिसांकडे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्या संदर्भात पोक्सो न्यायालयात हा खटला दाखल केला. पोक्सो न्यायालयासमोर याबाबत आरोपीकडून आरोप नाकारले जात होते. परंतु तीन वर्षाच्या बालिकेच्या वडिलांनी दिलेल्या साक्षीमुळे आरोपीचा दोष सिद्ध झाला. त्याला जन्मठेपेची शिक्षा पोक्सो न्यायालयानं सुनावलेली आहे.
वकिलांनी न्यायालयासमोर मांडले मुद्दे :पीडित बालिकेच्या वतीनं वकिलांनी न्यायालयासमोर मुद्दे मांडले. 2 फेब्रुवारी 2016 रोजी रात्री दहाच्या नंतर झोपडपट्टीमध्ये आरोपीनं त्या मुलीवर बलात्कार केला. तो शेजारीच राहणारा होता. दुसऱ्या शेजाऱ्यानं त्या मुलीच्या किंकाळ्या ऐकल्या होत्या. आरोपीनं लोकांना घटनेची चाहूल लागताच जवळच्या मंदिराच्या पायरीवर पीडित बालिकेला सोडले. तो फरार झाला होता. आरोपीनं बलात्कार केल्यामुळं मुलीला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. वीस दिवस मुलगी रुग्णालयामध्ये होती. तिला लघवी देखील करता येत नव्हती. इतका त्रास तिच्या गुप्तांगांना झालेला होता. आरोपीच्या वतीने वकिलांनी मुद्दा मांडला होता की, त्यानेच बलात्कार केला आहे, या संदर्भातले स्पष्टपणे ठोस पुरावे समोर येत नाहीत. तसंच मुलगी साक्ष देऊ शकत नाही. पण मुलीचा बाप केवळ साक्ष देतो तेवढ्यावरून आरोपीचा दोष सिद्ध कसा होऊ शकतो. तसंच आरोपी सात वर्षापासून तुरुंगातच आहे. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीश एस जे अन्सारींनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.