मुंबई -मनी लॉड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत यांना गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार प्रकरणात अटक केली. ( Praveen Raut Money Laundering Case ) त्यावर बुधवारी पार पडलेल्या सुनावणी दरम्यान ईडीने न्यायालयासमोर सांगितले की प्रवीण राऊत यांनी अनेक राजकीय नेत्यांना पैसे दिले आहे, अशी बाब तपासातून समोर आली आहे. त्यामुळे आणखी कोठडीची आवश्यकता आहे. त्यावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने राऊत यांच्या कोठडीत 14 फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे. ( PMLA Court Extend Praveen Raut Custody )
तपासात सहकार्य न केल्यामुळे अटक -
प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. एचडीआयएल रिअल इस्टेट या कंपनीद्वारे पत्राचाळ जमीन घोटाळ्यात एक हजार कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. प्रवीण राऊत यांचा पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे मारल्यानंतर राऊत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांना दक्षिण मुंबईतील कार्यालयात नेऊन चौकशी सुरू केली होती. मात्र, अनेक तासांच्या चौकशीनंतरही तपासात सहकार्य न केल्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांना अटक केली.