मुंबई -पीएमसी बँकेवर अचानक झालेल्या या कारवाईमुळे ग्राहकांमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटली आहे. या पार्श्वभूमीवर बँकेचे निलंबित मुख्य कार्यकारी अधिकारी जॉय थॉमस यांनी प्रतिक्रिया दिली. गेले ७ ते ८ वर्ष बँकेत अनियमितता होती. ही अनियमितता आम्ही रिझर्व्ह बँकेला सांगण्याचा प्रयत्न केला. यामधून बाहेर पडण्याच्या उपाययोजना सांगण्याचा प्रयत्न करणार असतानाच रिझर्व्ह बँकेने आम्हाला वेळ न देताच आर्थिक निर्बंध लादले, असा आरोप आता थॉमस यांनी केला आहे.
हेही वाचा - म्हाडाच्या आरआर बोर्डाचे व्यवहार होणार आता ऑनलाईन
थॉमस म्हणाले, बँकेवर ओढवलेल्या परिस्थितीला मी जबाबदार असून संचालक जबाबदार नाहीत. मात्र, बँकेवर ओढवलेल्या आर्थिक परिस्थितीवर पत्रकारांनी विचारलेल्या इतर प्रश्नाची उत्तरे न देताच ते निघून गेले.
सध्या रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवरील व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादाही निश्चित केली आहे. खातेधारकांना आपल्या खात्यातून महिन्याला केवळ १ हजार रूपये काढता येणार आहेत. पंजाब आणि महाराष्ट्र कॉपरेटीव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर बँकेचे निलंबित मुख्य कार्यकारी अधिकारी जॉय थॉमस यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आपली बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना आमची बँक पाच राज्यात काम करत असून उलाढाल २० हजार कोटी रुपये इतकी आहे. आम्ही एचडीआयएल कंपनीला जमीन आणि इतर संपत्तीच्या बदल्यात २५०० कोटींचे कर्ज दिले आहे. बँकेकडे एचडीआयएलची संपत्ती तारण असल्याने ही रक्कम बुडाली असे म्हणजे चुकीचे असल्याचे थॉमस यांनी सांगितले.
हेही वाचा - संधिसाधू सरकारची निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांवर कारवाई - राहुल गांधी