मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र बँक व एचडीआयएलच्या तब्बल ४३५५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखेकडूनही तपास सुरू आहे. यासंदर्भात आत्तापर्यंत झालेल्या तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचे संचालक जसविंदर सिंग बनवत यांना अटक केली आहे.
बनवत हे पीएमसी बँकेचे कर्ज, गुंतवणूक व इतर महत्त्वाच्या विषयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पीएमसी बँकेने एचडीआएलला दिलेल्या हजारो कोटी रुपयांच्या कर्जामागे या संचालकाचा मोठा हात असल्याचेही आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यासोबतच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विश्वनाथ श्रीधर प्रभू व श्रीपाद गोविंद जेरे या दोन व्यक्तींनासुद्धा अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही व्यक्ती 'यार्डी प्रभू कन्सल्टंट एन्ड व्हॅल्युअर्स' या कंपनीचे अधिकारी आहेत. पीएमसी बँकेचे माजी एमडी जॉय थॉमस यांच्या सांगण्यावरुन या दोघांनी बँकेच्या मालकीच्या संपत्तीचे व्हॅल्युएशन २०१२ व २०१५ मध्ये अधिक दाखवून तशा प्रकारचा अहवाल रिझर्व बँक ऑफ इंडियाला पाठवलेला होता.