नवी दिल्ली -महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेगासेस प्रकरणावरुन पंतप्रधानानांवर निशाणा साधला. पेगासस प्रकरण खरे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
कोरोना परिस्थितीत हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, महागाई नियंत्रण, बेरोजगारी, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न यासारख्या विषयांमध्ये केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे ते आणखी या प्रश्नांवरुन जनतेचे लक्ष हटवत आहेत. मात्र, पेगासस प्रकरणात सत्य असेल, तर पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
पेगासस फोन प्रकरण तापणार असल्याची चिन्हे दिसत आहे. या प्रकरणी आता ईस्रायलमध्ये गेलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. तसे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप झाल्याचा दावा केला होता. पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप करुन हेरगिरी केल्याच्या आरोपावरून कॉंग्रेसने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही हाच धागा पकडत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. हे प्रकरण २०१७-१८ मधील असल्याचे ते म्हणाले.