मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये येत आहेत. संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या कर्नाटकमार्गे महाराष्ट्रात येण्यावर एक टिप्पणी केली. पंतप्रधानांनी महाराष्ट्रामध्ये हे जाहीर करावे की बेळगावमधील मराठी भाषिक जनतेवर अत्याचार होऊ देऊ नका अशा सूचना त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. अशा अनेक विषयावर त्यांनी आज आपली मते परखडपणे मांडली.
महाविकास आघडीच्या काळातले प्रकल्प : मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांचा मान राखला गेला पाहिजे. म्हणून त्यांचे स्वागत जरूर आम्ही देखील करतो. मात्र ते ज्या प्रकल्पांचे उद्घाटन आज करणार आहेत. त्यातले प्रमुख प्रकल्प शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये होती त्यावेळचे आहेत. शिवसेनेच्या कार्यकाळामध्येच या प्रकल्पांची सुरुवात आणि पायाभरणी झालेली आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे. संजय राऊत पुढे म्हणाले की, मुंबईतल्या जनतेला देखील या संदर्भात माहिती आहे की महाविकास आघडीच्या कार्यकाळामध्ये मुंबई महानगर पालिकेने या मूलभूत प्रकल्पांची पायाभरणी केलेली होती. आता केवळ त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. महाविकास आघडीने सुरुवात केलेल्या प्रकल्पांवर आता एक प्रकारे देशाचे पंतप्रधान शिक्कामोर्तब करत आहेत ही वस्तुस्थिती आहे.
सीमा भागात मराठी जनतेवर अत्याचार : सीमा भागातील मराठी जनतेच्या समस्यांबाबत देखील राऊत यांनी माध्यमांसमोर परखड मते व्यक्त केली. पंतप्रधान यांनी याबाबत महाराष्ट्राला सार्वजनिक मंचावरून जरूर सांगावे की, बेळगावमध्ये असलेल्या मराठी भाषिकांवर अन्याय होऊ देऊ नका. त्यांना त्रास होणार नाही, याबाबतची सर्व खबरदारी घ्या अशा सूचना मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आहेत. हे पंतप्रधानांनी आज सांगायला हवे. आपल्या महाराष्ट्रातील मराठी भावाबहिणींवर बेळगाव सीमाभाग परिसरात कसा आणि कोणता अत्याचार झाला. हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे त्या संदर्भात पुन्हा तसा अन्याय होणार नाही. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत, हे पंतप्रधानांनी जाहीर करावे.