मुंबई/पुणे :PM Narendra Modi Pune Visit:२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय भाजपा नेतृत्वाकडून महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. मुख्यतः भाजपा नेत्यांकडून केंद्रस्थानी पुणे जिल्हा आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पुणे दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील ऑक्टोंबर महिन्यात पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या पुण्याच्या १ ऑगस्टच्या दौऱ्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या २ मार्गांचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले होते. तसेच त्यांच्या हस्ते चांदणी चौक पुलाचे लोकार्पणही केले गेले होते.
सुशिक्षित मतदार संघाचा जिल्हा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गत २ महिन्यांतील हा दुसरा पुणे दौरा असणार आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सध्या राज्यातील राजकीय घडामोडी पाहता पुणे जिल्हा हा भाजपाच्या केंद्रस्थानी आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार या दोघांनी या जिल्ह्यावर विशेष लक्ष ठेवले आहे. सुशिक्षित मतदार संघाचा जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याकडे पाहिले जाते.
महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा-मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ५ ऑक्टोबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील नव्या टर्मिनलचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर विमान प्रवाशांच्या सेवेत लवकरच हे टर्मिनल दाखल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा टर्मिनल उद्घाटनाच्या निमित्तानं असला तरी, त्यात अनेक महत्त्वाच्या राजकीय मुद्यांवर खलबते होणार असल्याचीही चर्चा आहे. विदर्भातील अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी पुढील १५ ते २० दिवसांत शरद पवार भाजपासोबत जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात पुणे दौऱ्यावर येणार असल्यामुळे त्यांच्या दौऱ्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी गटात सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहे. या सर्वात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची आहे.