मुंबई : प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी केंद्र सरकारने सेमी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या आहेत. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान सप्टेंबर २०२२ पासून वंदे भारत एक्सप्रेस चालविण्यात येत आहे. या एक्सप्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केली जात होती. मध्य रेल्वे मार्गावर घाट आहेत. या घाटात इतर एक्सप्रेसना अतिरिक्त इंजिन लावून घाट पार करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये ही ट्रेन चालवायची कशी असा प्रश्न रेल्वे प्रशासनापुढे होता. यावर तोडगा काढावा अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली होती.
पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार : वंदे भारत एक्सप्रेसच्या दोन रेक पुढील महिन्यात दाखल होणार आहेत. सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते साईनगर शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर या दोन मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. १० फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. यावेळी पंतप्रधान दोन्ही गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. परंतू अद्यापही मध्य रेल्वेने यासंदर्भात कोणतीही अधिकृतपणे घोषणा केलेली नाही.
वंदे भारतला १६ एसी डबे : ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये १६ एसी डबे असणार आहेत. मुंबई ते साईनगर शिर्डी आणि सोलापूर ते मुंबई मार्गावर या दोन्ही मार्गावर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ मंगळवार सोडून आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातील सहा दिवस धावणार ( गुरुवार वगळता ) आहे. या ट्रेनचा प्रवास ५ तास ५५ मिनिटांचा असेल. संध्याकाळी सव्वा सहा वाजता सुटून रात्री १२ वाजून १० मिनिटांनी ही ट्रेन पोहोचणार आहेत. दादर, ठाणे, नाशिक रोड या स्टेशनला ही ट्रेन थांबणार आहे. सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातील सहा दिवस धावणार (बुधवार वगळता) आहे. ६ तास ३० मिनिटात प्रवास पूर्ण करेल. सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी सुटून दुपारी १२.३५ वाजता सीएसएमटीला पोहोचणार. ही ट्रेन दादर, ठाणे, लोणावळा, पुणे, कुर्डुवाडीला थांबणार आहे.
1,128 प्रवाशांचा प्रवास :16 डब्यांच्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 1,128 प्रवासी प्रवास करू शकतात. महाराष्ट्रात दोन वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. एक ट्रेन मुंबई ते अहमदाबाद आणि दुसरी नागपूर ते विलासपूर अशी आहे. वंदे भारत 200 किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहे. मात्र रेल्वे बोर्डाने त्यांना सध्या 160 किमी प्रतितास वेगाने धावण्याची परवानगी दिली आहे. एक वंदे भारत एक्स्प्रेस तयार करण्यासाठी 110 कोटींची खर्च आला आहे.
हेही वाचा :shirdi saibaba: हैद्राबादच्या साईभक्ताने केले साईबाबा मंदिराला गोल्डब्रासचे सिंहासन दान