मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अल्जामिया-तुस-सैफियाह अरबी अकादमीच्या मुंबई कॅम्पसचे उद्घाटन करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत.
तुमच्या कुटुंबातला सदस्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले की, मी इथे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही. माझ्याकडे जे भाग्य आहे ते कदाचित फार कमी लोकांना मिळाले आहे. मी चार पिढ्यांपासून या बोहरा समाजातील कुटुंबांशी जोडलेला आहे. बोहरा समाजाचे माझ्यावरील प्रेम आजही अबाधित आहे. मी कुठल्याही देशात गेलो तर मला बोहरा समाजातील सदस्य नक्की भेटायला येतात. मी तुमच्या कुटुंबातला सदस्य आहे. इथे येणे म्हणजे कुटुंबात आल्यासारखे वाटत आहे. पाणी वाचविण्यात बोहरा समाजेचे मोठे कार्य आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी बोहरा समाजाविषयी काढले.
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन : अल्जामिया-तुस-सैफियाह ही दाऊदी बोहरा समुदायाची प्रमुख शैक्षणिक संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईतील या अल्जामिया-तुस-सैफियाहच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासोबतच सांताक्रुज चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपास प्रकल्प या दोन प्रकल्पाचे लोकार्पण देखील पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने मुंबईवर पोलीस बंदोबस्त देखील चोख करण्यात आला आहे. 20 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला आले होते.
मुस्लिम सौहार्द वाढविण्यावर भर:राष्ट्रीय नागरिकत्व सूची आणि नागरिकत्व कायद्यातील सुधारणांवरून भाजप आणि केंद्र सरकार विरोधात देशभरात वातावरण तयार झाले होते. हे वातावरण निवळावे आणि मुस्लिम व अन्य धर्मीयांशी सौहार्द वाढावा, यासाठी भाजपच्या केंद्रीय वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजप मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार व इतरांच्या माध्यमातून बोहरा समाज आणि अन्य मुस्लिम पंथीयांमधील मौलवी व मान्यवरांच्या शिष्टमंडळांनी नवी दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदी व अन्य नेत्यांच्या भेटीगाठी गेल्या एक-दीड वर्षात घेतल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी हैदराबाद येथेही नुकतेच गरीब व कष्टकरी मुस्लिमांना विकासात बरोबर घेण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईसह राज्यात मुस्लिम सौहार्द वाढविण्यावर भर देण्यास सुरूवात केली असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा : PM Flag Off Vande Bharat Train Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा