मुंबई -भाजपच्या अनेक विनंत्यानंतरही शिवसेना भाजप युतीचे घोडे अद्याप गंगेत नाहले नाही. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर असून यादरम्यान युतीसंदर्भातल्या घडामोडींना वेग येणार आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असल्याने सध्या सत्तेत सोबत असलेल्या शिवसेनेचे मन वळवण्यासाठी भाजप नेते पुढे सरसावले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे लवकरच मातोश्रीवर याबाबत बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेने पंतप्रधान मोदी यांच्यावरील टीका तरी थांबवावी याबाबत भाजपकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
युतीसंदर्भातील घडामोडींना वेग येणार; पंतप्रधान मोदी शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर - पंतप्रधान मोदी
लोकसभा निवडणुकांची आचार संहिता लागण्यास काही दिवसांचा अवधी उरला असताना पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रासाठी काय असणार आहे? याबाबतही मोदी आपल्या भाषणात उल्लेख करण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकांची आचार संहिता लागण्यास काही दिवसांचा अवधी उरला असताना पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रासाठी काय असणार आहे? याबाबतही मोदी आपल्या भाषणात उल्लेख करण्याची शक्यता आहे. मोदी यांचा हा एकदिवसीय दौरा असून यात ते धुळे आणि यवतमाळमध्ये जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते बहुचर्चित-मनमाड-धुळे-इंदोर रेल्वेमार्गाचे भूमिपूजन होणार आहे. त्याचबरोबर २४०० कोटींच्या सुळवडे-जामफळ लिफ्ट इरीगेशन या प्रकल्पाचे भूमीपूजनही यावेळी होणार आहे. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान धुळ्यात एका जाहीर सभेला संबोधित करतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी यवतमाळला रवाना होतील. तिथे त्यांच्या हस्ते बचतगटांना उमेद कार्यक्रमांतर्गत निधीवाटप होणार आहे. पांढरकवडा येथेही एका प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. तसेच यवतमाळमध्येही ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
दरम्यान धुळे आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या ठिकाणी होत असलेल्या सभेत पंतप्रधान मोदी सध्या राजकारणांवर तसेच शिवसेनेसोबतच्या संबंधांवर काही भाष्य करतात का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम राजकीय नसून सरकारी विकासकामांच्या भूमिपूजनाचा असल्याचे यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.