मुंबई - PM Modi shared Suresh Wadkar song : राम मंदिराच्या उद्घाटनाला मोजके काही दिवस उरले असताना देशभर राममय वातावरण निर्माण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या सोशल मीडियावरुन ते श्रीरामाचे गुण गौरव करणाऱ्या अनेक सांस्कृतिक गोष्टी पोस्ट करत आहेत. आज पंतप्रधान मोदी यांनी सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकर यांनी गायलेलं 'हृदय में श्रीराम' हे गीत 'X' वर शेअर केलं आहे. त्यावर गायक सुरेश वाडकर यांनी आनंद व्यक्त केलाय.
पंतप्रधानांनी गाणं शेअर केल्यानंतर 'ईटीव्ही भारत'नं सुरेश वाडकर यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पंतप्रधान मोदींसारख्या महान व्यक्तीनं हे गाणं शेअर करणं हा त्यांनी आणि प्रभू श्रीरामानं दिलेला मोठा आशीर्वाद असल्याचं सुरेश वाडकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्याशी झालेला संवाद आम्ही वाचकांसाठी देत आहोत.
पंतप्रधानानं गाणं तुमचं ट्विट केलंय. या क्षणी तुमच्या भावना काय आहेत?
खूप आनंद होतोय. आपल्या भारतीय कुटुंबाचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडून प्रशंसा होणं, जे नशीबांनं आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आहेत, अशा व्यक्तीकडून गाण्याची प्रशंसा होणं, त्यांच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असतं त्यांनी आमच्या गाण्याबद्दलही सांगणं, त्यामुळे लोक हे गाणं नक्की ऐकणार. हा प्रभू रामचंद्रांचा आणि पंतप्रधान साहेबांचा मोठा आशीर्वाद आहे.