नवी दिल्ली PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (२६ ऑक्टोबर) महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर देणार आहेत. यावेळी ते शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतील. पंतप्रधान कार्यालयानं ही माहिती दिली. याशिवाय पंतप्रधान मोदी गोव्यालाही भेट देणार आहेत. ते गोव्यात होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करतील.
७,५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण : पीएमओनं दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी भाविकांना दर्शनासाठी रांगेत उभे राहण्यासाठी साईबाबा मंदिर परिसरात बनवलेल्या नवीन दर्शन रांग इमारतीचं उद्घाटन करणार आहेत. आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात मोदी सुमारे ७,५०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं लोकार्पण करतील. याशिवाय ते गोव्यातील मडगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये ३७ व्या राष्ट्रीय खेळांचं उद्घाटन करणार आहेत. यानंतर ते खेळांमध्ये सहभागी खेळाडूंना संबोधित करतील.
साई भक्तांसाठी नवी वेटिंग रुम : पंतप्रधान कार्यालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मोदी गुरुवारी दुपारी एक वाजता शिर्डी येथे पोहोचतील. तेथे ते साईबाबांच्या मंदिरात प्रार्थना करतील. याशिवाय मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या वेटिंग रुमचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या वेटिंग रुममध्ये दहा हजारांहून अधिक भाविकांची बसण्याची क्षमता आहे. यामध्ये भाविकांना क्लोक रूम, टॉयलेट, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्र इत्यादी सुविधाही मिळतील. या नव्या दर्शन क्यू कॉम्प्लेक्सची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते ऑक्टोबर २०१८ मध्ये करण्यात आली होती.