मुंबई - सध्या जगभरासह राज्यावरही कोरोनाचे गंभीर सावट असून त्याजोडीला गेल्या आठवड्याभरात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे आधीच खराब झालेल्या रस्त्यांची आता चांगलीच दुर्दशा झाली आहे. कोरोना नियंत्रणात प्रशासन गुंतले असल्याने रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिणामी वाहन चालकांना खड्ड्यांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पाहुयात राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील रस्त्यांची परिस्थिती....
जळगाव -जिल्ह्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात संततधार पाऊस सुरू होता. पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ची तर अवस्था अतिशय वाईट आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम केलेले असल्याने वाहनधारकांना खूप अडचणी येत आहेत. पावसामुळे महामार्गाची खूप वाईट अवस्था झाली आहे. धुळे जिल्ह्यातील फागणे ते जळगाव तालुक्यातील तरसोद आणि तरसोद ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली अशा दोन टप्प्यात या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम होणार आहे. परंतु, फागणे ते तरसोद या टप्प्याचे काम रखडले आहे. दुसरीकडे जळगाव ते औरंगाबाद महामार्गावर काही ठिकाणी काम अपूर्ण असल्याने अडचणी आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था पावसामुळे अतिशय वाईट झाली आहे. अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खडी उन्मळून बाहेर आली आहे.
रायगड - जिल्ह्यातून मुंबई-गोवा महामार्ग जात असून कशेडी घाटापर्यंत जिल्ह्याची हद्द आहे. पळस्पे ते इंदापूर हा पहिल्या टप्यातील रस्ता आहे. पावसाळ्यात पेण ते इंदापूरपर्यंत महामार्ग रस्ता हा पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सव सणाला येणा-जाणाऱ्या चाकरमान्यांना खड्डेमय रस्त्यानेच यावे लागत आहे. खड्डेमय रस्ता असल्याने वाहने ही होडीसारखी डुलत डुलत जाताना दिसतात. अलिबाग रामराज मार्गे रोहा, पेझारी नागोठणे, रेवदंडा मुरुड हे अंतर्गत रस्तेही पावसामुळे खड्डेमय झाले आहेत. रस्त्याच्या निकृष्ट, अवेळी कामामुळे आणि राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षतेमुळे जिल्ह्यातील महामार्ग अंतर्गत रस्त्याची दुर्दशा कारणीभूत ठरली आहे.
वाशिम- जिल्ह्यातील जऊळका येथील काटेपूर्णा नदीच्या पुलावर पडलेल्या खड्यांमुळे मुंबई-नागपूर महामार्गावर वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. पूल अतिशय जीर्ण झाला असतानाही त्यावरून जड वाहतूक होत आहे. पुलावर असणारे खड्डे दरदिवशी अपघातास आमंत्रण देत आहेत. हे खड्डे चुकवण्याचा प्रयत्न वाहनधारक करीत असल्याने एखाद्या वेळी मोठा अपघात होण्याची भीती आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन पुलाच्या डागडुजीचे काम करण्याची मागणी होत आहे.
जालना- अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट आहे. जालना-औरंगाबाद रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर दोन ठिकाणी पथकर नाके आहेत. मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे पावसाचे पाणी साचल्यानंतर या खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि वाहनांचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे रस्त्यावर धूळही साचली आहे. जालना शहरात देखील प्रत्येक भागामध्ये रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. दोन वर्षांपूर्वी शहरात सर्वत्र सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले होते. या रस्त्यांवर देखील आता खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. रस्त्यांच्या बाजूला बसविलेले सिमेंट गट्टू देखील आता उखडून जात आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान ग्रामीण भागातही ज्याठिकाणी अवजड वाहतूक आहे, अशा रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. एकंदरीत मागील महिन्याभरात पडलेल्या पावसामुळे रस्त्यांची दाणादाण उडाली आहे.
गोंदिया- जिल्ह्यात मागील आठवड्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यातच १९ ऑगस्ट (गुरुवार) सायंकाळपासून २० ऑगस्टच्या सकाळपर्यंत पडलेल्या जोरदार पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. तिरोडा-तुमसर मार्गावरील भिसी नाल्याजवळील कच्चा पूल वाहून गेला, त्या मार्गावरील वाहतूक बंद पडून संपर्क तुटला होता. त्याचप्रमाणे गोंदिया शहरातील सखल भागातही पाणी साचले होते. सालेकसा तालुक्यातही अनेक रस्ते बंद होते. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अनेक मार्गांवर खड्डे पडले आहेत. त्यातून वाहनांना ये-जा करण्यासाठी कमालीची कसरत करावी लागत आहे. गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या, सडक-अर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या गोंदिया-कोहमारा-नवेगावबांध महामार्गावर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर असलेल्या पुलावरदेखील मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.
सिंधुदुर्ग- जिल्ह्यात सर्व रस्ते सुमारे साडेआठ हजार किलोमीटर लांबीचे आहेत. सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पर्यायी मार्ग आणि 'सर्व्हिस' मार्गावरून वाहतूक सुरू आहे. या मार्गाच्या सर्व्हीस मार्गांची अवस्था अत्यंत वाईट आहे. कणकवली सारख्या शहरात सध्या चिखलमय मार्गातून प्रवास करावा लागतो. तालुक्यातील महत्त्वाच्या भागांना जोडणारे साडेपाच हजार किलोमीटर लांबीचे रस्ते हे जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहेत. या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते हे वळणा-वळणाचे आहेत. ते डोंगर कपारीतून जातात. त्यामुळे अतिवृष्टीत या मार्गांची अवस्था सध्या अत्यंत वाईट बनली आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यात एकूण २ हजार ८३० एवढे रस्ते असून या मार्गांची अवस्था सर्वात वाईट आहे.