मुंबई - शहरात झाडांची संख्या कमी आहे. झाडे कमी असल्याने पर्यावरणावर त्याचा परिणाम होत आहे. यासाठी मुंबईमध्ये जपानी मियावाकी पद्धतीने झाडे लावण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मियावाकी पद्धतीने मुंबईत ६४ ठिकाणी ३ लाख ७३ हजार ८१६ झाडे लावली जाणार आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव आज झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
मुंबईत १ करोड ३० लाख नागरिक राहतात. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईमध्ये २९ लाख ७५ हजार झाडे असल्याचे समोर आले आहे. मुंबईमधील नागरिकांची संख्या पाहता झाडांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे मुंबईमध्ये प्रदूषण आहे. पर्यावरणाचा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. शहरात झाडे लावण्यास जागा कमी असल्याने मुंबईमध्ये कमी जागेत जास्त झाडे लावता यावीत म्हणून जपानी पद्धतीच्या मियाविकी पद्धतीने झाडे लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यासाठी पालिकेने सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात ऍकेशिया इको प्लांटेशन, केसरी इन्फ्रा बिल्ड, ऍफॉरेस्ट इको या कंपन्यांनी सहभाग घेतला. १०० चौरस मीटर जागेवर झाडे लावण्यासाठी ऍकेशिया इको प्लांटेशन या कंपनीने २१ हजार ५०० रुपये, केसरी इन्फ्रा बिल्ड या कंपनीने २४ हजार ९०० रुपये तर ऍफॉरेस्ट इको कंपनीने १ लाख ७७ हजार रुपये इतका दर आकारू असे निविदा भरताना स्पष्ट केले.
मुंबईमधील शहर आणि पश्चिम उपनगरातील ३७ भूभागांवर ५० हजार २०० चौरस मीटर जागेवर १ लाख ५० हजार ६२५ तर पूर्व उपनगरात २७ भूभागावर ७४ हजार ४२ चौरस मीटर जागेवर १ लाख २३ हजार १९१ झाडे लावली, अशी एकूण ६४ भूभागांवर ३ लाख ७३ हजार ८१६ झाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी ऍकेशिया इको प्लांटेशन या कंपनीने १०० चौरस मीटरवर झाडे लावण्यासाठी २१ हजार ५०० रुपयांचा तर केसरी इन्फ्रा बिल्ड या कंपनीने २४ हजार ९०० रुपये इतका दर आकारू असे म्हटले आहे.