मुंबई -जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते आज वरळी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यंदाच्या मोसमातील वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर आज दिवसभरात मुंबईत ८३ ठिकाणी १ हजार २०० पेक्षा अधिक झाडांची लागवड करण्यात आली. तसेच मुंबईत विविध ठिकाणी एकूण ४,८०० रोपट्यांचे वाटपदेखील करण्यात आले, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
आज पर्यावरण दिन -
सन १९७४ पासून जगभरात दरवर्षी ५ जून रोजी पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या परिसरातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सदैव कटिबद्ध असणारी आणि त्यादृष्टीने अव्याहतपणे कार्यरत असणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिकादेखील दरवर्षी पर्यावरण दिनी वृक्षारोपण करीत असते व पावसाळ्यातील वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभदेखील करीत असते. याच अनुषंगाने आज बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मियावाकी वने फुलविण्यात येणार -
पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या शृंखलेत मुख्य कार्यक्रम हा आज सकाळी वरळी परिसरातील लाला लजपतराय मार्गालगत आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी १ हजार झाडांचे 'मियावाकी वन' फुलविण्यात येणार असून महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री यांच्याहस्ते वृक्षारोपण करुन या वनाचा व यंदाच्या मोसमातील वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईमध्ये स्थानिक प्रजातींची तब्बल २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प महापालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे.