महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bali Shah Baba Dargah : पीरसय्यद बाली शाहबाबा दर्ग्याला 439 वर्षाचा इतिहास, दर्गा अनाधिकृत नाही; समाजवादी पक्षाचा दावा

नवी मुंबईतील पीरसय्यद बाली शाहबाबा दर्गा अनाधिकृत नसल्याचा दावा समाजवादी पक्षाने केला आहे. हजरत पीरसय्यद बाली शाहबाबांचा 439 वर्षापूर्वीचा ईतिहास असल्याचे समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सलीम मुल्ला यांनी म्हटले आहे.

Bali Shah Baba  Dargah
Bali Shah Baba Dargah

By

Published : Mar 28, 2023, 9:11 PM IST

पीरसय्यद बाली शाहबाबा दर्गा अनाधिकृत नाही

नवी मुंबई : नवी मुंबईतील पामबीच मार्गाजवळ असलेला हजरत पीरसय्यद बाली शाहबाबा यांचा दर्गा हा सव्वा चारशे वर्षाहून प्राचीन असून तो अनधिकृत नसल्याचा दावा समाजवादी पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सलीम मुल्ला यांनी केला आहे. नुकताच हजरत पीरसय्यद बाली शाहबाबा यांचा 439 वा वार्षिक उरूस मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविक येथे उपस्थित होते.

439 वा वार्षिक उरूस साजरा :हा दर्गा हा केवळ आम्हा मुस्लिम बांधवांची नव्हे तर स्थानिक सर्व धर्मियांची अस्मिता असून मुस्लिम बांधवांसोबतच इतर धर्मीय देखील बाली शाहबाबांच्या मजारीच दर्शन घेतात. आता रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. मनसे या संपलेल्या पक्षाला प्रत्येक रमजान महिन्यात मुस्लिम धर्माविरोधात गरळ ओकण्यासाठी नवा मुद्दा लागतो. गेल्यावर्षी भोंग्याचा मुद्दा पुढे करत रणकंद माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याचे पुढे काय झाले हे सगळ्यांनाच माहित असल्याचे सलीम मुल्ला म्हणाले.

मनसेच्या आरोपात तथ्य नाही :मनसेने उचललेल्या बाली शाहबाबांचा दर्गा अनधिकृत असल्याच्या मुद्द्याला काही एक अर्थ नसून आम्ही याविरोधात नवी मुंबई पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त तसेच सिडकोला याबाबत तक्रारदेखील केली असल्याचे त्यांनी सांगितले. याअगोदर 1997 ला दर्ग्याच्या ठिकाणी करण्यात आलेल्या वाढीव बांधकामावर कारवाईबाबत नोटीस आली होती. त्यानंतर 2014 ला सिडकोने वाढीव बांधकाम तोडले. मात्र, बाली शाहबाबांच्या मुख्य मजारीला हात देखील लावण्यात आला नसल्याचे मुल्ला म्हणाले.

आमच्याशी गाठ :आम्ही नवी मुंबईकर गुण्यागोविंदाने रहात आहोत. उपऱ्या गजानन काळेंनी अगोदर इतिहासाचा, नवी मुंबईचा अभ्यास करावा असा सल्लाही मुल्ला यांनी यावेळी दिला. तसेच उगाच संवेदनशील, धार्मिक भावना भडकावणारे मुद्दे उचलाल तर, आमच्याशी गाठ आहे असा इशारा देखील मुल्ला यांनी दिला. यावेळी या दर्ग्यात बाबांची भक्तिभावाने पुजा करणारे मोहम्मद गफूर शेख देखील उपस्थित होते.

राज ठाकरेंनी पक्षावर लक्ष ठेवावे :त्यांनी सव्वाचारशे वर्षे प्राचीन असलेल्या या दर्ग्याची माहिती सांगत आपल्या पाचहून अधिक पिढ्या बाली शाहबाबांच्या भक्तीसेवेत होत्या. आमची सहावी पीढी असल्याचे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष सर्फराज अहमद यांनी देखील मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर टीका केली. तसेच राज ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करावे उगाच नकोत्या मुद्यांना हात घालू नये असे, सर्फराज म्हणाले.

मनसे स्टाइलने उत्तर :या अगोदर मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष, प्रवक्ते गजानन काळे यांनी नवी मुंबईतील पामबीच मार्गाजवळ असलेल्या या दर्ग्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या संदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केले होते. गजानन काळे यांनी या प्रकरणाबाबत, 'नवी मुंबईतील पामबीच मार्गालगत टीएस चाणक्या इंडियन मेरीटाइम्स युनिव्हर्सिटी आहे. त्याच्या भिंतीला लागूनच मोठ्या जागेवर अतिक्रमण करून तेथे दर्गा बांधण्यात आला आहे. बाजूलाच कांदळवन आहे. तसेच समुद्र किनारा आहे. समोरच्या बाजूला बीएआरसी आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा अतिसंवेदनशील भाग आहे. अशा परिसरात मोठ्या प्रमाणात जागा करून, रस्ता रुंद करून हा दर्गा बांधण्यात आला आहे. तसेच माझी राज्य सरकारला, सिडकोला, वन विभागाला, मेरिटाईम बोर्ड, ठाणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना विनंती आहे की, हे अतिक्रमण आहे. राज ठाकरे म्हणतात तसे जागा बळकावण्यात आलेली आहे. हे आक्रमण आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा धोका आहे. आपण तत्काळ या गोष्टीवर कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाइलने गणपतीबाप्पाचे मोठे मंदिर इथे आम्ही नक्की उभारू, असे गजानन काळे यांनी म्हटले होते.


हेही वाचा - Rahul Gandhi: राहुल गांधी सरकारी बंगला रिकामा करणार! म्हणाले, या आठवणी कधीच विसरणार नाही

ABOUT THE AUTHOR

...view details