मुंबई - माटुंगा येथील आव्हान पालक संघ या दिव्यांग शाळेतील असामान्य मुलांनी अप्रतिम रॅम्प वॉक आणि नृत्य सादर केले. स्वयंसिद्धा महिला मंडळ आणि क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज मुंबई तर्फे श्रावण महोत्सव शिरोडकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सामान्य महिलांसोबतच दिव्यांग महिलांना संधी देण्यात आली होती.
रॅम्प वॉक करत दिव्यांग्यानी जिंकली उपस्थितांची मने दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व धर्मातील देवी देवतांची वेशभूषा केली होती. कोणी गणपती, कोणी साईबाबाची वेशभूषा साकारली होती. त्यांचे नृत्य बघून सर्वांनी सभागृहात टाळ्यांचा गजरात विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल या हेतूने त्यांना सहभागी करून घेण्यात आले होते.
आमच्या विद्यार्थ्यांना आज या व्यासपीठावर बघून खूप आनंद होत आहे. खर तर या मुलांमध्ये खूप गुण आहेत. मात्र, त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नाहीत. आज त्यांना व्यासपीठ मिळाले आणि त्यांच्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्याची संधी मिळाली, असे आव्हान पालक संघाच्या नृत्य शिक्षिका तनुजा भटसावळे यांनी सांगितले.
दरवर्षी आम्ही स्वयंसिद्धा महिला मंडळातर्फे श्रावण महोत्सवाचे आयोजन करतो. मात्र, यावेळी काही तरी वेगळे करण्याचा विचार करत आम्ही यावेळी दिव्यांग मुलींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांनी सादर केलेले सादरीकरण हे नक्कीच सामान्य महिलांपेक्षा कमी नव्हते, असे स्वयंसिद्धा महिला मंडळाच्या श्रृती लाड यांनी सांगितले.