मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे लाडके धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला. पोलिस ठाण्यात जाऊन या महिलेने रितसर तक्रार दिली. त्यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणाची रोजदार चर्चा सुरु झाली. या दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जाहीर खुलासा दिला. त्यात त्यांनी आरोप करणाऱ्या महिलेच्या मोठ्या बहिणीसोबत परस्पर सहमतीने संबंध असल्याचे कबुल केले. तसेच या संबंधातून दोन मुले असून सध्या ते त्यांच्या कुटुंबासह राहत असल्याचेही सांगितले. या खुलाशानंतर बलात्काराचे हे प्रकरण सर्व प्रकारच्या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. ठिकठिकाणी याची रंजक चर्चा सुरु झाली. या प्रकरणाला जोडून इतरही प्रकरणे हक्काने चर्चेत दाखल झाली.
या महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली असली तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यात, काही खासगी बाबींची जाहीर कबुली दिली असल्याने धनंजय यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भरीस भर म्हणजे, आरोप करणारी महिला आज (गुरुवार) सकाळी वकिलासह पोलिस ठाण्यात पोहोचली. गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तिने लावून धरली. त्यानंतर या प्रकरणाने उग्र रुप धारण केले. कुणाचा बळी घेतल्याशिवाय हे प्रकरण थंड होणार नाही, असे जाणवू लागले.
जनता दरबाराला हजेरी
बलात्काराच्या या आरोपांची आणि त्यानंतर धनंजय यांनी दिलेल्या खुलाशाची राष्ट्रवादीत गंभीर नोंद घेण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या जावायाला एनसीबीने अटक केली असल्याने ही दोन्ही प्रकरणे एकाच वेळी पक्षासमोर उभे ठाकली. यावर राष्ट्रवादीने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली. नवाब मलिक यांच्यावर वैयक्तिक आरोप नसल्याने त्यांची आपसूक सुटका होणार हे जवळपास निश्चित होते. पण, धनंजय मुंडे यांच्यावर पक्ष काय निर्णय घेईल, यावर लक्ष लागून होते. त्यात शरद पवारांनी, धनंजय यांच्यावर असलेले आरोप गंभीर असल्याचे सांगितल्याने आता त्यांची खुर्ची जाणार असे उताविळ माध्यमांमध्ये झळकू लागले. पण यापूर्वी धनंजय यांनी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयातील नियोजित जनता दरबाराला हजेरी लावली होती. त्याच वेळी हे पक्के झाले होते, की सुटका झाली आहे.