मुंबई- केरळ राज्यातील सीपीएम पक्षाचे प्रमुख बलाकृष्णन कोडीएरी यांचा मुलगा बिनोय कोडीएरी याच्या विरोधात ओशिवरा पोलिसांनी एका 33 वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर बिनोय कोडीएरी यास मुंबई पोलिसांनी 72 तासांच्या आत ओशिवरा पोलिसांकडे हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
बिनोय कोडीएरीवर बलात्काराचा गुन्हा दाखल, 72 तासांच्या आत व्हावे लागणार पोलिसांसमोर हजर याप्रकरणी पीडित 33 वर्षीय महिलेकडून बलात्काराची तक्रार आल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
काय आहे प्रकरण-
या प्रकरणातील 33 वर्षीय पीडित महिला दुबईमधील एका डान्स बारच्या माध्यमातून बिनोय कोडीएरीच्या संपर्कात आली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर आपण अविवाहित असून आपल्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यास लग्न करू, असे बिनोयने पीडित महिलेला सांगितले. त्यानंतर बिनोयच्या या भूलथापांना बळी पडलेल्या पीडित महिलेने 2009 पासून 2015 पर्यंत बोनोयसोबत शरीर संबंध ठेवले. यामधून त्यांना अपत्यही झाले होते. 2015 पासून दुबईतील बांधकाम व्यवसायात तोटा होत असल्याचे कारण देत बिनोय याने पीडित महिलेला पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर सदर पीडितेने बोनोयला लग्न करण्यास सांगितले. यादरम्यान बिनोय पीडितेच्या घरच्यांना भेटत होता. मात्र, पीडितेला स्वतःच्या घरच्यांशी ओळख करून देत नव्हता.
यानंतर बिनोय याच्या सोशल मिडियावरील माहितीवरून तो आगोदरच विवाहित असून त्यास 2 मुले असल्याचे पीडितेच्या लक्षात आले. या प्रकरणी वेळोवेळी लग्नाचा तगादा लावूनही आरोपी लग्न करत नाही. तसेच खर्चासाठी पैसे देत नसल्याने सदर पीडित महिलेने ओशिवरा पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.