मुंबई - अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेल्यास १० वर्षे कारावास आणि ५ लाख रुपये दंडाची तरतूद नव्या कायद्यात केली आहे. हा कायदा अतिकठोर आणि अन्यायकारक असल्याचा मुद्दा उपस्थित करत वाहन चालक, मालक संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. वाहनधारकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे सोमवारी दिसून आले.
Live Updates
- विविध टॅक्सी संघटना आणि ट्रक संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारनं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये आमच्याशी चर्चा करावी. आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत. पण सरकार हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रीय ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन दिल्लीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
- केंद्र सरकारनं वाहन चालकांच्या बाबतीत नवा कायदा केला असून या कायद्याच्या विरोधात ट्रक चालक हे आक्रमक झाले आहेत. हा काळा कायदा असून हा कायदा जोपर्यंत परत घेत नाही, तोपर्यंत आम्ही गाड्या सुरू करणार नसल्याची आक्रमक भूमिका ट्रक चालकांनी घेतली आहे.
- केंद्र सरकारनं वाहन चालकाच्या बाबतीत नवा कायदा केला आहे. या कायद्याच्या विरोधात पेट्रोल पुरवठा करणाऱ्या इंडियन ऑइल, एचपीसी एल, बीबीसीएल या तिन्ही कंपन्यांच्या टँकर चालकांनी संप पुकारला आहे. या संपाचा फटका पुण्यातील मार्केट यार्ड येथे बसला आहे. आज मार्केटयार्ड येथे आवक कमी झाली आहे. टँकर चालकांच्या संपाचा 10 टक्के फटका बसला असल्याचं मार्केट यार्डचे अध्यक्ष बापू भोसले यांनी सांगितलं आहे.
टँकर चालकांचे राज्यभरात संप सुरू असून या संपाचा परिणाम जळगाव जिल्ह्यात झाल्याचा पाहायला मिळत आहे. पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या सोशल मीडियावरील चर्चेमुळे मध्यरात्री जळगावातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची तुफान गर्दी झाली होती. या सर्व वाहनचालकांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केल्यामुळे दुसऱ्या दिवशी या पेट्रोल पंपावरील पेट्रोल डिझेलचा साठा संपला आहे. या ठिकाणी पेट्रोल शिल्लक नसल्याचे बोर्ड लावण्यात आला आहे.
- वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी, अत्याचारी नवीन मोटार वाहन कायदा केंद्र सरकारने रद्द करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. जनविरोधी काळे कायदे पारित करून जनतेस वेठीस धरण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस असे समाजातील सर्व घटक सातत्यानं केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत असल्याची टीका विरोधी पक्षनेत्यांनी मोदी सरकारवर केली.
- पेट्रोल पंप इंधनाची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी संप पुकारल्यानं स्कूल बस असोसिएशन संघटनेनं आज संध्याकाळी पाच वाजता बैठक बोलाविली आहे. या बैठकीत स्कूल बस सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
- पुण्यातील लोणी काळभोर येथील पेट्रोल डिझेल टर्मिनलमधून वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. पुणे शहर ,पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड शहर सातारा, अहमदनगर आणि इतर ठिकाणी पेट्रोल डिझेल टँकर वाहतुक सुरळितपणं सुरू आहे. वाहतूकदार संपाचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही. पेट्रोल- डिझेल भरून टँकर इंधन डेपोमधून बाहेर पडत आहेत.
- हिट अँड रन रोड अपघाताच्या नवीन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी सोमवारी राज्यभरात विविध ठिकाणी 'रास्ता रोको' करत निदर्शने केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करणाऱ्या ट्रक चालक व टँकर चालकांच्या कामबंद आंदोलनामुळे राज्यातील काही ठिकाणी इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्याचं पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यानं सांगितलं.