मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव असताना पावसाळी आजारांपासून मुंबईकरांचे संरक्षण करता यावे, म्हणून पालिकेचा पेस्ट कंट्रोल विभाग सतत कार्यरत आहे. या विभागातील ५५ कर्मचारी अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतरही या विभागातील कर्मचाऱ्यांनी मुंबईत डेंग्यूच्या २५९८७ ठिकाणी तर मलेरियाची १०६३५ ठिकाणी शोधून नष्ट केली आहेत. तसेच ४९९६ नोटीस बजावण्यात आल्या असून ३ लाख ७६ हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती या विभागाचे प्रमुख राजेंद्र नारिंग्रेकर यांनी दिली.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यादरम्यान पावसाळी आजारांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. या आजारांचा प्रसार रोखता यावा म्हणून पालिकेच्या पेस्ट कंट्रोल विभागाकडून धूर फवारणी केली दाते. डेंग्यू आणि मलेरियाचे डास आढळून येतात अशा ठिकाणी कार्यवाही करत त्या आळ्या नष्ट केल्या जातात. तसेच ज्या ठिकाणी या आळ्या आढळून येतात त्यांना पालिकेकडून नोटीस बजावून कायदेशीर कारवाई तसेच दंड वसूल केला जातो.
यावर्षी मुंबईत १ जानेवारी ते २८ जुलै या कालावधीत मलेरियाच्या आळ्या शोधण्यासाठी २४२०९३ इतक्या पाण्याच्या जागा तपासल्या त्यात १०६३५ ठिकाणी मलेरियाच्या आळ्या सापडल्या. तर डेंग्यूच्या आळ्या शोधण्यासाठी ६५९६६७९ पाण्याच्या जागा तपासल्या. त्यात २५९८७ ठिकाणी डेंग्यूच्या आळ्या सापडल्या. मलेरिया आणि डेंग्यूच्या आळ्या सापडलेल्या जागी कार्यवाही करत आळ्या नष्ट करण्यात आल्या आहेत. ३० जूनपर्यंत डेंग्यू मलेरियाच्या आळ्या ज्या ठिकाणी सापडल्या अशा ४९९६ नोटीस बजावण्यात आल्या आहेत. १५६ प्रकरणे कोर्टात दाखल करण्यात आली आहेत.