मुंबई:माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांच्या विरोधात ईडीने आर्थिक व्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल केला या प्रकरणात नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आलेले अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख व त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे हे आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराप्रकरणी आरोपी आहेत. सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणातही सचिन वाझेला विशेष सीबीआय न्यायालयाने माफीचा साक्षीदार केले आहे. गुन्ह्याबाबत असलेली सर्व माहिती व प्रत्येक आरोपीची त्यातील भूमिकेविषयी स्पष्ट व खरी माहिती देण्याची अट वाझेला घालण्यात आली आहे.
तपासादरम्यान जमा केलेल्या मौखिक व कागदोपत्री पुरावे व वाझे याने दिलेला जबाब हे एकमेकांची पुष्टी करत आहेत. काही ठिकाणी त्याचा जबाब अगदी महत्त्वाचा आहे. वाझेने देशमुखांचा साथीदार म्हणून काम केले आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे असे ईडीने वाझेच्या अर्जावर उत्तर देताना म्हटले आहे. वसुलीद्वारे आलेल्या पैशांवर देखरेख व ते देशमुखांकडे सोपवण्याची पालांडे व शिंदे यांच्या कार्यपद्धतीची माहिती वाझेला होती. देशमुख 100 कोटी वसुलीच्या कटातील मुख्य सूत्रधार आहेत असे ईडीने उत्तरात म्हटले आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माफीचा साक्षीदार होण्यासाठी वाझेने 9 जून रोजी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. ईडीने त्यावर उत्तर दाखल केले. विशेष न्यायालयाने या अर्जावरील सुनावणी 21 जुलै रोजी ठेवली आहे. संबंधित गुन्ह्यांत आरोपीची भूमिका व अन्य आरोपींची भूमिका आरोपीने स्पष्ट करण्याच्या अटीवरच त्याचा माफीचा साक्षीदार बनण्याचा अर्ज मंजूर करण्यास तपास यंत्रणेला हरकत नाही.