मुंबई - राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढवण्यासाठी बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्यासंदर्भातील धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या कुट्या तात्पुरत्या स्वरुपाच्या असतील, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवारे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या 8 किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येतील. या संदर्भातील अर्ज www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुढील वर्षीपासून इतर चौपाट्यांवर देखील या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवरच तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येईल. एका चौपाटीवर कमाल 10 कुटी उभारता येतील. त्या उभारण्यासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल.