मुंबई- मुंबईतील अनेक पूल ब्रिटिशकालीन असून ते धोकादायक बनले आहेत. त्यावर भार पडल्यास पूल कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे यावर्षी देखील गणेशभक्तांनी मिरवणूक काढू नये, पुलांवर गर्दी करू नये, लाऊड स्पीकर बंद ठेवावा आणि पुलावर थांबू नये, असे निर्देश महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. धोकादायक पुलांबाबत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बैठक बोलावण्यात आल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
मागील वर्षी मुंबईतील सीएसएमटी येथील हिमालय पूल कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिकेने मुंबईमधील पुलांचे ऑडिट केले होते. त्यात अनेक पूल धोकादायक असल्याने ते पाडावेत आणि नवीन बांधावेत, असा सल्ला देण्यात आला आहे. धोकादायक पुलांवर जास्त भार पडणार नाही याची काळजी पालिकेकडून घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मागील वर्षी पालिकेने धोकादायक असलेल्या पुलांवरून गणेशभक्तांनी मिरवणूक काढू नये, पुलांवर गर्दी करू नये, लाऊड स्पीकर बंद ठेवावा आणि पुलांवर थांबू नये, असे निर्देश दिले होते. दरम्यान, धोकादायक असलेल्या काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहे, तर काही पुलांच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहेत. त्यामुळे, गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पालिकेने दिलेले निर्देश पाळावेत, आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
१६ टनांपेक्षा जास्त भार नको..
गणेश आगमन, विसर्जनाच्या वेळी मिरवणूक काढू नये, गर्दी टाळावी. करीरोड ओव्हरब्रीज, ऑर्थर रोड ओव्हर ब्रीज, चिंचपोकळी रेल्वे ओव्हरब्रीज या पुलांवर भाविक व वाहनांचे मिळून एका वेळेस १६ टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच, पुलांवर लाऊड स्पीकर लावू नये, असे निर्देश पालिका व वाहतूक पोलिसांनी दिले आहेत.