मुंबई- गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने प्रचंड घोटाळे केले. त्या सर्व घोटाळ्यांना क्लीन चिट देण्याचे काम तत्कालीन भाजप सरकारने केले. परंतु, त्यातही ज्या शिवरायांचे नाव घेऊन भाजप सत्तेवर आला त्यांच्या स्मारकातही भ्रष्टाचार करण्याचे प्रचंड मोठे पातक भाजपने केले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उघडकीस आणलेल्या शिवस्मारक घोटाळ्यातील आरोपांना कॅगने अधोरेखित केले आहे. त्यावर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याचे काँग्रेस पक्ष स्वागत करत असून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, थोड्या दिवसांपूर्वीच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्मारकातील घोटाळा पुराव्यानिशी उघड केला होता. एका खाजगी कंपनीवर मेहरनजर ठेऊन हजारो कोटी रुपये उकळण्याचे कारस्थान भाजप सरकारने केले होते. २६९२ कोटी रुपये अंदाजित रकमेच्या प्रकल्पासाठी एल.अँड.टी या कंपनीने ३८२६ कोटी रुपयांची निविदा भरली होती. सदर कंपनीची निविदा सर्वात कमी किमतीची आहे असे दर्शवून केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमावलीचे उल्लंघन करीत सरकारने या कंपनीबरोबर वाटाघाटी केल्या व सदर रक्कम २५०० कोटी अधिक जीएसटी अशी कमी करण्यात आली. परंतु, गंभीर बाब ही की याकरता शिवस्मारकाचा पुतळा व अधिग्रहित क्षेत्र तसेच आराखड्यात प्रचंड मोठे बदल करण्यात आले. जे केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमांचे उल्लंघन आहे.