मुंबई- आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड येथील झाडे वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी शुक्रवारी आरे परिसरात आंदोलन केले होते. यातील २९ जणांना पोलिसांनी अटक केली होती. यासर्वांना अखेर काल दिंडोशी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. अटक करण्यात आलेल्या मुलांच्या नातेवाईकांची गोरेगाव येथे पत्रकार परिषदेत जामिनाची माहिती दिली आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
एकीकडे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते, तर मनात दुसरीकडे झाड वाचविण्यासाठी आपल्या नातेवाईकांना जेलमध्ये जावे लागल्याचे दुःखही झळकत होते. पत्रकार परिषदेत अटक झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी सरकार व पोलिसांविरोधात रोष व्यक्त केला.
अटक करण्यात आलेले व त्यांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया
ऋषिकेश नंदकुमार पाटील
कोणतंही अनाधिकृत काम करत नसताना पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले. बायका मुलींची देखील गय केली नाही. पोलिसांनी आमच्यावर केलेला आरोप चुकीचा आहे. भारतात पर्यावरणाचा नाश होतो आहे. त्यावर आवाज उठवणे हा गुन्हा झाला का?
प्रकाश भोईर
पर्यावरण वाचवा हे शिकवले गेले. तेच करण्यासाठी आम्ही गेलो होतो. झाड तोडणे गुन्हा आहे. त्याऐवजी झाड वाचवणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला गेला. त्या झाडांवर राहणाऱ्यांचा जीव देखील गेला, त्यांच्या खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी भोईर यांनी केली. आमच्या पूर्वजांकडून जमिनी घेऊन प्रसाद वाटतात तसे सर्व संस्थांना जमिनी दिल्या गेल्या. आमच्या पूर्वजनांना माहीत असते तर त्यांनी जमिनी दिल्याच नसत्या. माझ्या बायकोने झाड वाचवले हा गुन्हा केला, तर मला तिचा अभिमान वाटतो. आता एखाद्या रोपट्याने प्रश्न केले की, मला लावल्यावर झाड शेवटपर्यंत वाचेल का, तर त्याला उत्तर काय देऊ, अशी खंत भोईर यांनी व्यक्त केली.