अहमदनगर - नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात देशासह राज्यभर आंदोलने होत आहेत. अनेक ठिकाणी या कायद्याला जोरदार विरोध होताना दिसत आहे. अनेक ठिकाणच्या आंदोलकांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षांनी सहभाग घेतला आहे. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी होताना दिसत आहे.
राज्यात कुठे कुठे होत आहेत आंदोलने
अहमदनगर
अहमदनगर शहरात आज विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात आंदोलने केली. या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, आरएसपी, फॉरवर्ड ब्लॉक, जीपीआईएमएल आदी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोदी सरकारच्या या कायद्यामुळे संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाला तिलांजली मिळणार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गरीब जनतेला हद्दपार करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. तसेच कायदा मागे घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मुंबई
सुधारित नागरिकत्व कायद्यासह 'एनआरसी' कायद्याला विरोध करण्यासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातील एक आकर्षण म्हणजे एक ५ वर्षाचा मुस्लीम मुलगा आपल्या वडिलांबरोबर आंदोलनात सामील झाला आहे. यावेळी नागरिकांनी आम्हाला आत्ताच देश सोडावा लागतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
वांद्रे पश्चिम
नागरिकत्व सुधारित कायदा रद्द व्हावा यासाठी आज वांद्रे पश्चिम परिसरात एमआयएम पार्टीकडून शांततेत निदर्शने करण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच वांद्रे पोलिसांनी एमआयएमचे वांद्रे तालुका अध्यक्ष वाहीद खुरेशी व काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आम्हाला कॅबमुळे असुरक्षीत वाटत असून, आम्ही शांततेत वांद्रे परिसरात फलक घेऊन निदर्शन करणार होतो. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी एमआयएमचे वांद्रे तालुका अध्यक्ष वाहीद खुरेशी यांना ताब्यात घेऊन आमचा मोर्चा निकाली काढल्याचे वांद्रेचे एमआयएमचे जनरल सेक्रेटरी सलमान शेख यांनी सांगितले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यभर निदर्शने टाटा सामाजिक विज्ञान केंद्राच्या विद्यार्थ्यांचा विरोध
आज मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात वेगवेगळ्या सामाजिक संस्था व विद्यार्थी संघटना एकत्र येत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मोठे आंदोलन केले. यामध्ये टाटा सामाजिक विज्ञान केंद्राच्या विद्यार्थ्यांनी देवनार ते गोंवडी रेल्वेस्थानकापर्यंत चालत येत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
कुर्ला, घाटकोपर परिसरात आंदोलने
आज मुंबईच्या पूर्व उपनगरात कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर तसेच घाटकोपरमध्येही जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. कुर्ला, घाटकोपर परिसरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात शांततेत मोर्चे काढण्यात आले.
कोल्हापूर
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात संपूर्ण देशभरात आंदोलने होत आहेत. अनेक ठिकाणी लोकं रस्त्यावर उतरले आहेत. आज कोल्हापूरात सुद्धा डाव्या आघाडीने जोरदार निदर्शने केली. कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकांमध्ये डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नागरिकत्व सुधारणा कायद्याचा निषेध केला आहे.
अकोल्यात २२ डिसेंबरला सभा
एनआरसी व कॅब हे विधेयक देशाच्या अखंडतेला व एकतेला धोका निर्माण करणारे आहे. या विधेयकाच्या विरोधात अकोला क्रिकेट क्लब येथे 22 डिसेंबर रोजी सकाळी सभा आयोजित केली आहे. या सभेत या विधेयकाविरोधात ठराव घेन्यात येईल, अशी माहिती मुफ्ती अश्फाक कासमी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
धुळे
केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात डावी लोकशाही आघाडीच्यावतीने धुळ्यात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. हे विधेयक तत्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सांगली
नागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायद्याला सांगलीमध्ये जोरदार विरोध करण्यात आला. या कायद्यामुळे देशामध्ये दुफळी निर्माण झाली आहे. यामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्यात बाधा आणून देशाच्या एकात्मतेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आला. सांगली मध्ये स्टेशन चौकात कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मंजूर केलेले विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
नागपूर
एनआरसी आणि कॅब कायद्याविरोधात देशात वातवरण तापलेले आहे. या कायद्यालो विरोध करण्यासाठी आज नागपूर विधानभवनावर मुस्लिम बांधवांनी भव्य दिव्य असा मोर्चा काढला. या अधीवेशनातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा मोर्चा मानला जात आहे. जमाते इस्लामी हिंद या संघटनेसोबत मुस्लिम विद्यार्थी परिषद, मुस्लिम महिला संघटनांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला होता.
सोलापूर
मोदी सरकारने आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला देशभरातील विविध ठिकाणी तीव्र विरोध होत आहे. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापुरात वीस वर्षांतील सर्वांत मोठा मोर्चा निघाला. या मोर्चाचे नेतृत्व शहर काझी अमजदअली काझी यांनी केले. सोलापुरात निघालेला मोर्चा हा शांततेच्या मार्गानं निघाला.
ठाणे स्थानकाबाहेर काँग्रेसची निदर्शने
आज संपूर्ण भारत देशात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. नागरिकत्व संशोदन कायदा विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी काँग्रेसने निदर्शने केली. नागरिकत्व दुरुस्ती कायदा संमत झाल्यापासून देशभरात ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. भारतीय संविधानाच्या विरोधात, जातीधर्मात तेढ निर्माण करणारे, लोकशाहीचा गळा घोटणारे नागरिक संशोधन बिल (CAB) तसेच अभारतीय नागरिकत्व (NRC)बिल संमत करण्यात येत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
भिवंडी
मोदी सरकारने देशभरात एनआरसी व नागरिकत्व कायदा लागू केला आहे. मात्र, हा कायदा देशांमधील हिंदू-मुस्लिमांमध्ये भेदभाव निर्माण करणार असून, संविधानाचे कलम 14 चे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला. या कायद्याच्या विरोधात आज भिवंडीतील समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.
अमरावती
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आज अमरावती शहरात मुस्लिम समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान कुठलाही गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. इर्विन चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोर्चाला सुरुवात झाली. भाजप सरकारने देशभर नागरिकत्व सुधारित कायदा लागू करून देशात मुस्लिमांसोबत भेदभाव करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
परतवाडा (अमरावती)
केंद्र सरकारने नुकताच लागू केलेला नागरिकत्व सुधार कायद्याला देशात मोठया प्रमाणावर विरोध होत आहे. कठिकाणी मोर्चे, तर अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने होताना दिसत आहेत. आता या या नागरिकत्व सुधारना कायद्याविरोधात अमरावती जिल्ह्यातही नागरिकांनी आवाज उठवला आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा व अचलपूर शहरात जामियते ऊलमाईन या संघटनेच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा हजारो नागरिक सहभागी झाले होते.