मुंबई- मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर मुंबईत कायम आहे. आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे कुर्ला पश्चिममधील मिठी नदीजवळ असलेल्या क्रांती नगर परिसरातील तेराशे लोकांना स्थलांतरित करण्यात आले असून जवळच्या पालिका शाळेत या रहिवाशांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेच्या आपात्कालीन पथकासह एनडीआरएफचे पथक याठिकाणी दाखल झाले असून परिसरात बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
२६ जुलै, २००५ मध्ये मुंबईत जलप्रलय आला होता. त्यावेळी मिठी नदीमुळे मुंबईत हाहाकार उडाला होता. त्यानंतर मिठी नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याचे काम राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने हाती घेतले होते. त्यानंतर आजही मुंबईत मोठा पाऊस झाल्यास मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडत असते. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यावर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे लागते.