मुंबई - धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रद्द झाल्याने सगळे धारावीकर नाराज झाले आहेत. तर आता धारावीतील शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. 'शिवसेना पक्ष प्रमुख या नात्याने 'धारावी बचाव' आंदोलनात उद्धव ठाकरे सातत्याने आमच्याबरोबर होते. 400 चौरस फुटांचे घर देण्याचे आश्वासन दिले होते. असे असताना आता तेच मुख्यमंत्री झाल्याने आता धारावी पुनर्विकास मार्गी लागणार असे वाटत असताना आताही पुनर्विकास रखडला आहे. यामुळेही आम्ही नाराज झालो आहोत. पण आता मुख्यमंत्रीच धारावीचा पुनर्विकास मार्गी लावू शकतात, ही आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आम्ही लवकरच त्यांना भेटून प्रकल्पातील सर्व अडचणी दूर करत प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी करणार असल्याची माहिती धारावीतील शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांनी दिली आहे.
धारावीतील शिवसैनिकही आता आक्रमक, पुनर्विकास मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांना साकडे
'धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रद्द झाल्याने सगळे धारावीकर नाराज झाले आहेत. आता तर धारावीतील शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने 'धारावी बचाव' आंदोलनात उद्धव ठाकरे सातत्याने आमच्याबरोबर होते. 400 चौरस फुटांचे घर देण्याचे आश्वासन दिले होते. असे असताना आता तेच मुख्यमंत्री झाल्याने आता धारावी पुनर्विकास मार्गी लागणार असे वाटत असताना आताही पुनर्विकास रखडला आहे,' असे येथील कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
फक्त 'चाय पे चर्चा' वर 16 वर्षात 200 कोटी खर्च
धारावीचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने 2004 मध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पासाठी तीनदा वेळा निविदा काढल्या. पण पुनर्विकासाची एक वीट ही 16 वर्षात रचली गेली नाही. तीनही वेळा निविदा रद्द करण्यात आली असून आता चौथ्यांदा निविदा काढण्याचा घाट घालण्यात येणार आहे. तिसऱ्यांदा निविदा रद्द झाल्यामुळे पुनर्विकास आणखी किती तरी वर्षे बारगळणार असल्याने धारावीकर प्रचंड नाराज झाले आहेत. तर, आपल्या पक्षाची सत्ता असताना हा पुनर्विकास मार्गी लागत नसल्याने आता धारावीतील शिवसैनिकही आक्रमक झाला आहे. 16 वर्षात केवळ 'चाय पे चर्चा' आणि चिवडा-लाडूच्या बैठकांवर 200 कोटी खर्च करण्यात आला आहे. साधी एक निविदा मार्गी लावता आली नसल्याचे म्हणत माने यांनी आता शिवसैनिकच नव्हे तर धारावीतील सर्व रहिवासी, सर्व पक्षाचे लोक रस्त्यावर उतरून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नव्याने लढाई उभारणार असल्याचेही माने यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांना भेटणार
मुख्यमंत्री सुरुवातीपासून धारावीकरांच्या सोबत आहेत. त्यांच्या आंदोलनातही ते अनेकदा सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांना हा सर्व विषय माहिती आहे. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर धारावी प्रकल्प मार्गी लागणार याचा आम्हाला विश्वास आहे. आता हा प्रकल्प केवळ नोकरशाह काही तरी अडचणी काढून रखडवत आहेत. त्यामुळे आता आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार असून त्यांना त्वरित हा प्रकल्प मार्गी लागेल, या दृष्टीने ठोस पाऊल उचलण्याची मागणी करणार आहोत. दिवाळी आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या भेटीत नक्कीच काही तरी मार्ग निघेल, असा आम्हाला विश्वास आहे, असेही माने यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -धुळे : प्राचीच्या मारेकऱ्यांचा शोध घ्या, माळी समाजाची मागणी