मुंबई -राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटत नसल्याने ते थेट राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारमध्ये मांडले जातात. यानंतर ते तत्काळ मार्गी लागले जातात. यामुळे त्यांच्या प्रश्नाचे निराकरण झाल्यानंतर जनता इथून जाताना त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान दिसते आणि हेच समाधान जनता दरबारचे यश असल्याचे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅलार्ड पियर येथील असलेल्या मुख्य कार्यालयात गुरुवारी मुंडे यांचा जनता दरबार होता. यामध्ये राज्यभरातील विद्यार्थ्यां सोबतच अनेक नागरिकांनी रांगा लावून विविध प्रश्न आणि त्या संदर्भातील निवेदने मुंडे यांच्याकडे दिली. अनेक निवेदनावर काही मिनिटाच्या अंतरातच मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून ते मार्गीही लावले तर अनेक प्रश्न हे शासकीय स्तरावर सोडविण्यासाठी त्याची नोंद घेऊन ते पुढील कार्यवाहीसाठी तातडीने तयार करून संबंधित नागरिकांना त्यांची माहिती देण्यात आली.