मुंबई - लसीकरणा दरम्यान लसीचा तुटवडा असल्याने वेळोवेळी लसीकरणाच्या वेळेत बदल करावा लागतो. मुंबईत कधी कधी लसीकरण बंद असते, याची माहिती पालिका नागरिकांना ट्विटरवरून देत होती. मात्र, लसीकरणाची माहिती नागरिकांपर्यंत योग्य प्रकारे मिळत नव्हती. यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊन गोंधळ उडत होता. हा गोंधळ रोखण्यासाठी पालिकेने सोशल मीडिया, पालिकेची वेबसाईट तसेच पालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर लसीकरणाची अचूक वेळ दिली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
लसीचा तुटवडा -
मुंबईत मार्च २०२०पासून कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. मुंबईत रोज ६० ते ७० हजार लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत चार वेळा एक ते दीड लाख लसीकरण एका दिवसात करण्यात आले आहे. मुंबईत होणारे लसीकरण, लसीकरणाला मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद या प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीचा तुटवडा सतत जाणवत आहे. लसीचा तुटवडा जाणवत असल्याने अनेकवेळा लसीकरण बंद ठेवावे लागले आहे.
हेही वाचा -'फी'च्या तक्रारी संदर्भात आम्ही पाठपुरावा करीत आहोत - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
लसीकरणाची अचूक माहिती मिळणार -
मुंबईत सतत लसीकरणाची वेळ बदलावी लागत आहे. काही वेळा मोजकीच लसीकरण केंद्र सुरू असतात. कधी कधी लसीकरण बंद असते. ही माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी पालिका ट्विटरवर ही माहिती देत होती. मात्र, मुंबईकर सर्वच नागरिक ट्विटरचा वापर करत नसल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडत आहे. लसीकरणाची माहिती मिळत नसल्याने नागरिक लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी सोशल मिडियासह पालिकेच्या www.mcgm.gov.in या वेबसाईटवर रोज सायंकाळी दुसऱ्या दिवसाच्या लसीकरणाची वेळ, लसीचा साठा याची माहिती दिली जाणार आहे. तसेच पालिकेच्या 1916 या हेल्पलाईन क्रमांकावरही लसीकरणाची माहिती दिली जाणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
शुक्रवारी लसीचा साठा येणार -
लसीचा साठा नसल्याने शुक्रवारी ९ जुलैला लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी लसीचे एक ते दीड लाख डोस उपलब्ध होतील, त्यानंतर शनिवारी लसीकरण होईल. मात्र, लसीचा साठा जसा उपलब्ध होईल तशी लसीकरण मोहीम राबवण्यात येईल, असेही काकाणी यांनी स्पष्ट केले.
या ठिकाणी मिळणार माहिती -
- ट्विटर - www.twiter.com/mybmc
- वेबसाईट - www.mcgm.gov.in
- हेल्पलाईन क्रमांक - 1916