मुंबई- हैदराबाद येथे डॉ. तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेचा देशभरातून निषेध होत असून पीडितेला श्रद्धांजली वाहिली जात आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यातील नागरिकांकडून या घटनेविरोधात संताप व्यक्त केला जात असून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
हैदराबाद येथील अत्याचाराच्या घटनेविरोधात लातुरात निषेध मोर्चा काढण्यात आला. रविवारी शिवाजी मोटेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अष्टविनायक परिसरात कँडल मार्च काढण्यात आला होता. यावेळी हजारो विद्यार्थी उपस्थित होते. निषेध नोंदविण्यासाठी गणेश मंदिर परिसरात मेणबत्त्या पेटविण्यात आल्या होत्या. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी या मागणीचे फलक विद्यार्थ्यांच्या हाती होते. मुलींमधील एकी हाच संदेश समाजात जावा जेणेकरून अशाप्रकारचे धाडस पुन्हा होणार नाही म्हणूनच हा कँडल मार्च काढण्यात आला होता.
सोलापुरात डॉक्टरांनी केला घटनेचा निषेध
लातूरप्रमाणे सोलापुरातही या घटनेचा निषेध करण्यात आला. शहरातील डॉ. सुनील गायकवाड यांनी पीडित तरुणीचे चित्र असलेले बॅनर घालून चौका-चौकात जाऊन निषेध केला. स्त्रीयांवर वाढत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आपला संताप व्यक्त केला.
बीडमध्ये विविध संघटनांकडून मूक मोर्चा
हैदराबाद येथील डॉ. तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. या मुख्य मागणीसाठी बीडमध्ये विविध विद्यार्थी संघटनांनी व काही वकिलांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला.