मुंबई - तब्बल सात महिन्यांच्या मोनो रेल कालावधीनंतर मुंबईकरांच्या प्रवासासाठी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. प्रत्येक नागरिकाला या मोनोमधून प्रवास करण्यास मुभा मिळणार असल्याने प्रवाशांनी मोठ्या आनंदात स्वागत केल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
मोनो रेल सुरू झाल्याने प्रवाशांचा आनंदोत्सव
मोनोरेलप्रमाणेच सरकारने मेट्रोला सुद्धा लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
पहिल्याच दिवशी सकाळी आणि दुपारच्या सत्रात मुंबईकरांनी मोनोला चांगला प्रतिसाद दिल्याची माहिती मोनोरेल प्रशासनाकडून सायंकाळी देण्यात आली. मोनोरेल सुरू झाली म्हणून भक्ती पार्क ते किंग सर्कलदरम्यान प्रवास करण्यासाठी निघालेल्या गाला कुटुंबीयांनी या मोनोरेलच्या प्रवासाचे उत्साहात स्वागत केले. पेशाने शाळेतील शिक्षिका असलेल्या रश्मी गाला म्हणाल्या, लॉकडाऊननंतर मोनोचा हा पहिलाच प्रवास खूप आनंददायी सुखद वाटत आहे. मोनोचा प्रवास हा आरामदायी असल्याने त्याचा एक वेगळा आनंद मिळत असल्याचेही त्या म्हणाल्या.
अशोक गाला म्हणाले की, मोनोरेलच्या या प्रवासामुळे किमान रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीला तोंड देता येणार नाही आणि त्यामुळे आरामदायी प्रवास होत आहे. निशांत गाला म्हणाले, मोनोरेल चालू आहे की नाही, आम्ही पाहायला आलो होतो. परंतु ती सुरू असल्याचे दिसताच आम्ही प्रवास करायला सुरुवात केली. लॉकडाऊननंतर हा आमचा प्रवास अत्यंत आनंददायी असल्याचे ते म्हणाले. मोनोरेल सुरू झाल्यामुळे प्रवास करण्यासाठी आलेल्या विनोद गुरव यांनी सांगितले की, मोनोरेलप्रमाणेच सरकारने मेट्रोलासुद्धा लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.